इक्विटी किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडांच्या युनिटवर कर्ज घेता येते. यासाठी ही युनिट्स बँकेत किंवा बिगरबँक वित्तसंस्थेत (एनबीएफसी) तारण म्हणून ठेवून हे कर्ज घेता येते. हे कर्ज परत करताना कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थेने मंजूर केलेले व्याज द्यावे लागते. तुम्ही किती कर्ज घेता व किती काळासाठी घेता, त्यानुसार या म्युच्युअल फंडांवर १० ते ११ टक्के व्याजदर आकारला जातो. कर्ज घेतल्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स गहाण असतील, तर ते तुम्हाला विकता येत नाहीत, तसेच त्यांचे स्विचिंगही करता येत नाही. कर्ज काढताना ते इक्विटी म्युच्युअल फंडांवर घ्यावे. ते लिक्विड किंवा डेट फंडावर घेऊ नये.
म्युच्युअल डिमॅट स्वरूपात असेल, तुमच्या कर्जाची मागणी स्वीकृत झाली असेल, तर काही ऑनलाइन पोर्टल्सवर तुम्हाला कर्ज लगेच दिले जाते. तुमच्याकडे डिमॅट स्वरूपात युनिट नसतील तर मात्र तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाबरोबर किंवा फायनान्सियरबरोबर कर्जकरार करावा लागेल. मग तुमचा फायनान्सियर सीएएमएस किंवा कारवी यांसारख्या म्युच्युअल फंड निबंधकाकडे काही युनिट्सच्या बदल्यात कर्ज देण्याविषयी अर्ज करेल. जितके युनिट्स तुम्ही तारण म्हणून ठेवाल त्यांच्या एकूण मूल्याच्या साधारणतः ६० ते ७० टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळते. निबंधक हे कर्ज मंजूर करून तसे पत्र संबंधित म्युच्युअल फंडाला पाठवेल. त्याची एक प्रत गुंतवणूकदाराकडेही पाठवली जाईल. यामुळे किती युनिट्स तारण म्हणून ठेवले गेले आहेत, त्याची माहिती गुंतवणूकदाराकडेही राहिल.