nomination म्हणजेच नामांकन केले असल्यास गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर संबंधित नामांकित व्यक्तीकडे गुंतवणुकीचे हस्तांतरण करणे सोपे जाते. नामांकन केले नसेल तर मात्र गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर या गुंतवणुकीवर दावा करणाऱ्या त्याच्या कायदेशीर वारसाला असा दावा करताना अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये वैध वारस प्रमाणपत्र व अन्य वारसांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ते सादर करावे लागते.
फंडधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पैशांची काळजी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करणे म्हणजे नामांकनाची प्रक्रिया होय. म्युच्युअल फंडासाठी गुंतवणूकदार एखाद्या व्यक्तीचे नामांकन करू शकतो किंवा म्युच्युअल फंडांचे युनिट्स डिमॅट स्वरूपात असल्यास अशा डिमॅट खात्यासाठी तो नामांकन करू शकतो. नामांकन करण्यासाठी योग्य व्यक्ती ही गुंतवणूकदाराच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा विश्वासू व्यक्ती असू शकते. कोणत्याही नव्या पोर्टफोलिओसाठी, एकाच व्यक्तीच्या नावाने उघडण्यात आलेल्या पोर्टपोलिओ खात्यांसाठी नामांकन सुविधा घेणे अनिवार्य असते.
एका फोलिओसाठी गुंतवणूकदाराला तीन नामांकने देता येतात. एकापेक्षा जास्त नामांकने केल्यास त्या प्रत्येकाला या गुंतवणुकीतील किती टक्के हिस्सा द्यायचा ते गुंतवणूकदाराला लिहून द्यावे लागते. अशी टक्केवारी दिलेली नसल्यास गुंतवणूकदारानंतर नामांकित व्यक्तींना गुंतवणूक समान विभागून दिली जाते.
गुंतवणूकदाराची गुंतवणूक संयुक्त असेल तरीही तो नामांकन करू शकतो. मात्र, सोसायटी, विश्वस्त मंडळ (ट्रस्ट), कॉर्पोरेट बॉडी, हिंदु अविभक्त कुटुंबाचा कर्ता, मुख्यत्यार म्हणून नेमलेली व्यक्ती या सर्वांना नामांकन करता येत नाही. संयुक्त गुंतवणुकीसाठी नामांकन करता येते. यामुळे दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या हयात व्यक्तीच्या नावे सर्व गुंतवणूक हस्तांतरित होते. संयुक्त गुंतवणूकदारांमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्यास सर्व गुंतवणूक त्यांच्या नामांकित व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते.
फंडाची खरेदी करतानाच नामान्कनासम्बंधीची माहिती देणे आवश्यक असते !!