ओपन फंड योजनेतील पैसे केव्हाही काढता येतात पण आपला अपेक्षित परतावा मिळाल्याशिवाय सहसा फंडातून विनाकारण बाहेर पडून दुसरा फंड स्वीकारू नये !

फंडाची खालावलेली कामगिरी म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेण्यास एक  कारण ठरू शकते. प्रत्येक फंडाला कधी ना कधी खराब कामगिरीचा सामना करावा लागतो. केवळ कामगिरी खालावली म्हणून पैसे काढून घेण्याऐवजी फंडाची खालावलेल्या कारणांचा अभ्यास करणे गरजेचे असते. फंडाच्या निधी व्यवस्थापन करण्याच्या धोरणांत बदल, गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या उद्योग क्षेत्रांचा प्राधान्यकम बदलणे, निधी व्यवस्थापकांत बदल अशी एक ना अनेक कारणांनी फंडाची कामगिरी खालावण्याची शक्यता असते. दीर्घ काळ चांगली कामगिरी असलेला फंड तात्पुरता लहान कालावधीसाठी कमी परतावा देऊ शकतो. या कारणांचा शोध घेणे गरजेचे असते. चार किंवा त्यापेक्षा अधिक तिमाहीत फंडाच्या क्रमवारीत घसरण होत असेल तर फंडाची कामगिरी खालावली असे मानता येईल. फंडाच्या गुंतवणूक धोरणांत केलेल्या बदलांचा परिणाम दिसण्यासाठी कमीत कमी दोन तिमाहींचा कालावधी फंड व्यवस्थापकास देणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कामगिरी खराब असल्यास फंडाची कामगिरी खालवली असे म्हणता येणार नाही. फंडाची कामगिरी तपासण्यासाठी फंडाची एकांगी कामगिरी तपासण्याऐवजी फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत तपासणे गरजेचे आहे. अनेकदा फंड व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे खूपच अधिक निधी फंडात गुंतविल्यामुळे फंड व्यवस्थापनाला गुंतवणुकीच्या नवीन संधीचे वावडे असते. साहजिकच फंडाची कामगिरी खालावण्याची शक्यता निर्माण होते. विशेषत: स्मॉल अ‍ॅड मिड कॅप फंडाच्या बाबतीत असे वारंवार घडते. अशा वेळी सुज्ञ निधी व्यवस्थापक काही कालावधीसाठी नवीन गुंतवणूक घेणे बंद करतात. अशा फंडात सुरू असलेली नियोजनपूर्वक पद्धतीने गुंतवणूक सुरू राहते परंतु नवीन नियोजनपूर्वक पद्धतीने गुंतवणूक नोंदविता येत नाही.

‘सेबी’ने म्युच्युअल फंडांना म्युच्युअल फंड योजनांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहेत आणि यासाठी नियम तयार करण्यासाठी समितीची स्थापनासुद्धा केली आहे. उदाहरणार्थ तुम्ही मध्यम किंवा कमी जोखीम पत्करू शकणारे गुंतवणूकदार आहात म्हणून तुम्ही एखाद्या शॉर्ट टर्म फंडाची निवड केली आहात. भविष्यात या नवीन नियमानुसार या फंडाचे गुंतवणूक धोरण बदलून हा फंड क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड म्हणून अस्तित्वात आला तर हा फंड तुमच्या गुंतवणूक कक्षेला साजेसा ठरणार नाही. क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड हे धाडसी गुंतवणूकदारांसाठी असतात. अशा परिस्थितीत या फंडातून बाहेर पडणे योग्य ठरेल. थोडक्यात गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल तर आपण गुंतवणूक केलेल्या फंडांचासुद्धा आढावा घेणे गरजेचे आहे.

कामगिरीचा आढावा , व्यवस्थापनातील बदल ,  व धोरण बदल दिसल्यास सल्लागाराच्या सल्ला घेवून बाहेर पडणे योग्य !!

अभिप्राय द्या!