कष्टाच्या कमाईबाबत बहुतेकजण सतर्क असतात पण अचानक धनलाभ झाल्यास त्या रकमेचे काय करायचे याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. या रकमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात बरेच जण कमी पडतात आणि हा पैसा हातून केव्हा निघून जातो हे कळत सुद्धा नाही. सर्व पैसा हातून गेल्यानंतर शिल्लक राहतो  पश्चाताप. जगभरात लॉटरी, बोनस, विस्थापनातून मिळालेली भरपाई किंवा अन्य कारणांमुळे अचानक धनलाभ झालेल्या व्यक्तींपैकी एकतृतीयांश लोक काही वर्षांतच कंगाल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अचानक हाती पैसा आल्यास त्याचे

कसे  चांगले नियोजन करायचे ?

 स्व:कष्टातून हाती आलेला पैसा खर्च करताना जेवढी काळजी घेतली जाते. त्या तुलनेत अचानक धनलाभातून हाती येणारा पैसा खर्च करण्यात हात मोकळे सोडले जात असल्याची वास्तविकता आहे. कंपनीकडून किंवा सरकारकडून मिळालेला बोनस, वारसा हक्काने मिळालेल्या प्रॉपर्टीच्या विक्रीतून आलेली रक्कम, लॉटरी लागल्याने मिळणारी रक्कम, अचानक बक्षीस किंवा अन्य मार्गाने हाती येणारा पैसा हा स्व:कष्टातून मिळणाऱ्या रकमेएवढाच महत्त्वाचा असल्याचे लक्षात घ्यायला हवे. तसेच हाती मोठी रक्कम आल्यास त्याच्या नियोजनासाठी अधिकृत फायनान्सिअल प्लॅनरची मदत घ्यावी. मिळणाऱ्या रकमेतील मोठी रक्कम खर्च करण्यापूर्वी ती निदान ३ ते ६ महिने सुरक्षित ठिकाणी गुंतविण्याचाच सल्ला हे फायनान्सिअल प्लानर्स देतात. त्यानंतर त्याचे व्यवस्थित नियोजन करून सर्व रक्कम एकाच ठिकाणी न गुंतविता त्याची विभागणी करता येईल. त्यातील मोठी रक्कम जोखमीच्या ठिकाणी गुंतविण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी गुंतविण्याकडे कल ठेवणे श्रेयस्कर आहे.

टॅक्स प्लानिंग.
आपल्या हाती अचानक येणाऱ्या  रकमेवर आपल्याला टॅक्स देणे आवश्यक असते. पीएफ किंवा ग्रॅच्युईटीची मिळणारी रक्कम ही त्या कंपनीत किमान पाच वर्षे सेवा केली असेल तरच आयकर मुक्त असते. अन्यथा टॅक्स भरावा लागू शकतो.

कर्जे फेडण्यासाठी
अचानक होणाऱ्या धनलाभातून हाती येणाऱ्या रकमेतून आपल्यावरील मोठ्या व्याजदराची कर्जे फेडण्यासाठी सर्वप्रथम उपयोग करावा. उदा. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचे बिल आदी. हाऊसिंग लोनवर टॅक्समधून सूट मिळत असल्याने त्यातीही काही रक्कम गृहकर्ज फेडण्यासाठी वापरण्यासही हरकत आहे.
कर्जे चुकविल्यानंतर हाती शिल्लक राहिलेली रक्कम गुंतविण्याबाबत आपला प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्याने प्रॉपर्टी घेण्याचा विचार असेल तर त्यासाठी अचानक धनलाभाच्या रकमेचा प्राधान्याने विचार करण्यास हरकत नसावी . मात्र उरलेली रक्कम म्युच्युअल फंडाच्या डेट फंडात टाकणे योग्य .

बेफिकिरीने खर्च करू नका.

अचानक होणाऱ्या धनलाभाची रक्कम खर्च करताना बेफिकिरी दाखवू नये. आपल्याला गरज नसलेली वस्तू खरेदी करण्यावर तर मुळीच खर्च करू नये. अनेकांचा मोठ्या रकमेतून महागडे घर खरेदी करण्याकडे कल असतो पण त्यामुळे वाढणाऱ्या खर्चाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. व

या नियोजनासाठी अर्थसल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही उचित असते .!!

अभिप्राय द्या!