काही वेळा ग्राहक नवी पॉलिसी खरेदी करतात आणि त्यातील नियम व अटी त्यांना अपेक्षित असलेल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. पूर्वी, ग्राहकांसमोर या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सहन करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. परंतु, ‘आयआरडीए’ने ग्राहकांच्या सोयीसाठी केलेल्या तरतुदीमुळे आता या प्रश्नावर उपाय मिळाला आहे. आयआरडीए मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इन्शुरन्स कंपन्यांनी ग्राहकांना योजना दिल्यानंतर फ्री लूक पिरिएड पुरवणे आवश्यक आहे.
फ्री लूक हा योजनेचे दस्तावेज मिळाल्यापासून १५ दिवसांचा कालावधी असतो. हा कालावधी ग्राहकांना इन्शुरन्स पॉलिसीचे परीक्षण करण्याचा आणि योजनेत नमूद केलेल्या कोणत्याही अटी वा वैशिष्ट्यांबाबत ग्राहक समाधानी नसल्यास ती योजना न घेण्याचा अधिकार देतो. या कालावधी दरम्यान, योजना रद्द करता येते किंवा त्यातील वैशिष्ट्यांमध्ये बदल करण्यास सांगता येते. ग्राहकाने ती योजना रद्द करायचे ठरवल्यास योजनेत भरलेल्या हप्त्यातून वैद्यकीय तपासणी, रिस्क कव्हरसाठीचा खर्च, मुद्रांक शुल्क आदी खर्च वजा करून उरलेली रक्कम ग्राहकाला परत केली जाते.
प्री-लूक पिरिएडचे काही पैलू म्हणजे, हा कालावधी केवळ लाइफ इन्शुरन्स पॉलिसींना किंवा किमान ३ वर्षे काळासाठी असलेल्या हेल्थ इन्शुरन्स योजनांना लागू होतो. योजनाचा दस्तावेज मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत हा अधिकार वापरता येतो. योजनेचा दस्तावेज मिळाल्याची तारीख सिद्घ करणे ही योजनाधारकाची जबाबदारी असते.
फ्री-लूक पर्याय वापरण्यासाठी केवळ इन्शुरन्स कंपनीला विनंती करायची असते. बहुतांश केसेसमध्ये, फ्री-लूक अर्ज कंपनीच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतात. त्यामध्ये योजनाधारकाने योजनेचा दस्तावेज मिळाल्याची तारीख, एजंटची माहिती व बदल वा रद्द करण्याचे कारण असा तपशील द्यायचा असतो. योजनेचा मूळ दस्तावेज, पहिल्या हप्त्याची पावती, इन्डेम्निटी आणि कॅन्सल्ड चेक अशी अन्य कागदपत्रे द्यायची असतात. तसेच, रिफंड घ्यायचा असेल तर योजनाधारकाने बँकेचा तपशील द्यायचा असतो.
ह्या सोयीची माहिती कोणी agent सहसा ग्राहकांना देत नाही !!