लाभांश म्हणजे काय?

म्युच्युअल फंड त्याला मिळालेल्या नफ्यातून आपल्या गुंतवणूकदारांच्या युनिटवर लाभांश घोषित करतो. एखाद्या योजनेला मिळालेला नफा याचा अर्थ त्या योजनेतील साधनांची खरेदीपेक्षा अधिक दराने केलेल्या विक्रीतून आलेली कमाई किंवा त्या साधनांवर मिळालेला लाभांश किंवा (डेट फंडांच्या बाबतीत) मिळालेले व्याज होय. साधनांतून मिळालेला परंतु फंडात प्रत्यक्ष जमा न झालेल्या नफ्याचा उपयोग मात्र लाभांशासाठी करता येत नाही. हा नफा एनएव्हीमध्ये मिळवला जातो. याचा काही भाग म्युच्युअल फंडाकडून लाभांश म्हणून घोषित केला जातो. अर्थात, हा पैसा पुन्हा त्याच योजनेत खेळवून त्यापासून नवे शेअर्स किंवा डेट साधने खरेदी करण्याचा पर्याय त्या योजनेच्या फंड व्यवस्थापकाकडे असतो.

म्युच्युअल फंड दैनंदिन, मासिक, तिमाही किंवा वार्षिक तत्त्वावर लाभांश देऊ शकतात. लाभांश देण्याचा कालावधी योजनेनुसार बदलता असतो. कोणत्याही योजनेत लाभांश मिळण्याची खात्री देता येत नाही. मात्र बहुतांश योजना त्यांनी दिलेले लाभांश देण्याचे वचन पाळतात. तरीही, लाभांशाची रक्कम एकसमान नसते. लाभांश पर्यायांतर्गत एनएव्ही फारशी वाढत नाही आणि विशिष्ट पातळीपर्यंत एनएव्ही गेल्यास म्युच्युअल फंड लाभांश देतो. अशी कल्पना करा की, तुम्ही १४ रुपये एनएव्ही असलेल्या फंडात गुंतवणूक करून लाभांसाचा पर्याय निवडला आहे. या योजनेची कामगिरी चांगली झाली आणि एनएव्ही वाढून १६ रुपये झाली. फंडाकडून दोन रुपये लाभांश दिला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला दोन रुपये मिळतात, पण एनएव्ही पुन्हा १४ रुपये होते.

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांच्या योजनांतून मिळणारा कोणताही लाभांश करमुक्त असतो.

लाभांश पर्याय केव्हा निवडावा ?

जोखीम घेण्याची तयारी नसलेल्या व परतावा मिळण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी इक्विटी फंडांच्या योजनांमध्ये लाभांशाचा पर्याय निवडणे योग्य. ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांनी लाभांशाचा पर्याय निवडू नये, तर वृद्धी (ग्रोथ) पर्याय निवडावा. याचे कारण लाभांश अदा केल्यास चक्रवाढीचा (कम्पाउंडिंग) फायदा मिळत नाही. उच्च कराच्या कक्षेत येणाऱ्या व तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी पैसे गुंतवणाऱ्यांना लिक्विड अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडांमध्ये लाभांशाचा पर्याय निवडता येईल. याचे कारण त्यांच्या ३०.९ टक्के कराच्या तुलनेत लाभांश वितरण कर कमी असेल.

अभिप्राय द्या!