उद्दिष्टे व गुंतवणूक

आपण कोठेही आर्थिक गुंतवणूक करताना सर्वप्रथम कोणत्या उद्दिष्टासाठी गुंतवणूक करायची आणि किती काळ करायची ते ठरवणे महत्त्वाचे आहे. हे झाल्यावर या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या घडीला नेमका किती खर्च येणार आहे याचा अंदाज घ्यावा. त्यामध्ये महागाईची रक्कम मिळवावी. या उद्दिष्टासाठी तुम्ही नेमकी किती बचत करू शकाल, याचा अंदाज घ्यावा. या बचतीसाठी तुम्ही एकतर एसआयपी वापरू शकता किंवा एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकता. याशिवाय एकगठ्ठा व एसआयपी अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करू शकता.

एकदा तुमची उद्दिष्टे ठरली की त्यापर्यंत जाण्यासाठी योग्य फंड कोणते आहेत याचा मागोवा सल्लागारामार्फात घ्यावा.

उदाहरणार्थ, तुम्ही परदेशी सुटी घालवण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी पाच लाख रुपये खर्च येणार असेल तर त्यासाठी डेट फंड किंवा आर्बिट्राज फंड निवडा. हे उद्दिष्ट अल्पकालीन असेल तर वित्त नियोजक तुम्हाला डेट व आर्बिट्राज अशा दोन्ही फंडांतून गुंतवणूक करायला सांगेल. यामुळे तुम्हाला या गुंतवणुकीवर ६ ते ७.५ टक्के उत्पन्न मिळेल. याचवेळी तुमचे करदायित्व किती आहे त्याचाही अंदाज घ्या. डेट फंडात तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवल्यास त्यावर अल्पकालीन भांडवली लाभ कर लागू होतो, तर आर्बिट्राज फंड एक वर्षापेक्षा अधिक कालासाठी करमुक्त असतो. अशाच प्रकारे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला १० वर्षांनी पैसे लागणार असतील तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवू शकता. १५ वर्षांसाठी दरमहिना १० हजार रुपयांची एसआयपी केल्यास तुम्हाला १२ टक्के उत्पन्न मिळाल्यास तुम्ही ५०.४० लाख रुपये जमा करू शकाल.

उद्दिष्ट जवळ आल्यावर त्यासाठी पैशांची सोय करण्यासाठी धडपडण्यापेक्षा उद्दिष्टाधारित गुंतवणूक करणे अधिक श्रेयस्कर आहे. यामुळे तुमच्या गुंतवणुकीला निश्चित दिशा मिळते आणि भांडवल बाजारातील चढउतारांचा फटका तुम्हाला बसत नाही.

आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण उद्दिष्टे ठरवूया व  कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर SIPसुरु करावयाचे ठरवून एक वेगळे सीमोल्लंघन करूया !!

अभिप्राय द्या!