घर, कार, इलेक्ट्रॉनिक्स अशी महागडी खरेदी करताना आपण प्रचंड संशोधन करतो. मग, इन्शुरन्स पॉलिसी ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी खरेदी करण्याच्या बाबतीत संपूर्ण प्रक्रिया एजंटवर सोपवून आपण बहुतांशी निश्चिंत राहतो !!
आपल्यापैकी बहुतांश जण, %परतावा, खात्री व वन टाइम पेमेंट% असे शब्द ऐकले की तातडीने हा अर्ज तुम्हीच भरा आणि सहा कुठे करायची तेवढे फक्त सांगा, असे म्हणतात. परिणामी, आपल्यासाठी चुकीची असलेली किंवा अत्यंत वाईट असलेली, तसेच आपल्याला गरजेची नसलेली इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यामध्ये आपले कष्टाने मिळवलेले पैसे वाया जातात. आपले दुर्लक्ष होत असल्याचा फायदा घेणाऱ्या आणि आपण कष्टाने मिळवलेल्या पैशांची फसवणूक करणाऱ्या एजंटच्या जाळ्यात आपण अडकू शकतो. या किचकट परिस्थितीवर चांगले ग्राहक स्मार्टपणे मात करू शकतात.
ग्राहक म्हणून आपण ज्या प्रपोजल फॉर्मवर सही करतो तो कागद अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्यावरून आपली योजना एकतर जारी केली जाते किंवा नाकारली जाते. त्यामुळेच नेहमी हा अर्ज स्वतः भरावा, हे करणे कितीही कटकटीचे वाटले तरीही. हे काम एजंटवर सोपवल्यास चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. योजनाधारकाची जबाबदारी आवश्यक ती कागदपत्रे देणे आणि योग्य तिथे सही करणे यापुरती मर्यादित नसते. संबंधित उत्पादनाची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी आणि पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचण्यासाठी वेळ द्यावा.
कस्टमर केअर सुविधा
गोड बोलणाऱ्या सेल्समनच्या बोलण्याला भुलून काहीजण घोटाळा आणि अनावश्यक विमा योजना या जाळ्यामध्ये अडकू शकतात. सेकंड ओपिनीअन घेणे केव्हाही चांगले. सर्व प्रमुख विमा कंपन्यांचे चोवीस तास टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. त्यावरून माहिती घेता येऊ शकते. व्यवहाराच्या दरम्यान केव्हाही असे वाटले की एजंट काहीतरी चुकीचे सांगत आहे, तर आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी थेट विमा कंपनीशी संपर्क साधलेला बरा.
तसेच यापूर्वी प्रसिद्ध केल्यानुसार ” Free look period ” हा पर्याय सुद्धा ग्राहकांनी वापरावा !!