भीम” ऍप – Bharat Interface for Money..

By Omkar Dabhadkar

गेल्या ३ दिवसांत ३ छोटे बिझनेस इन्कम आणि मुलाच्या ट्रीटमेंटचा एक खर्च झाला. चारही व्यवहार प्रयत्नपूर्वक डिजीटल घडवून आणले. चारीवेळा डिजीटल पेमेंटचा सल्ला देतातच समोरून “ठीके, पेटीएम करूया?” हाच पहिला प्रतिसाद आला. चारीवेळा माझ्याकडून “मी पेटीएम नाही, भीम वापरतो” असं उत्तर गेलं – आणि चौघांनी – “आम्ही भीम वापरत नाही” असं सांगितलं. पेटीएम आणि भीम मधले फार महत्वाचे फरक लोकांना माहिती नसल्याचा हा परिणाम आहे.

फरक माहित नसल्याने लोकांचं नुकसान होत आहे. पेटीएम हे ई वॉलेट आहे. आपण त्याद्वारे व्यवहार करतो तेव्हा पेटीएम करन्सीमध्ये व्यवहार होतात. परंतु ती करन्सी रुपयांमध्ये बदलायची असेल तर चार्ज द्यावा लागतो. म्हणजे, वरील ३ बिझनेस व्यवहार मी पेटीएम द्वारे केले असते, तर माझ्या करंट अकाऊंट मधून पैसे काढण्यासाठी आधी मला पेटीएम कॅशचं रूपीज मध्ये रूपांतर करण्याचा चार्ज भरावा लागला असता. ह्या कमिशनवरच पेटीएम उभं आहे. हे कमिशन प्रत्येक व्यवहारासाठी १.९९ रूपये + जीएसटी इतकं आहे. महिन्यात ५०० व्यवहार केले तर हजार रूपये पेटीम दक्षिणा जाते. (व्यापाऱ्यांसाठी हे विशेष महत्वाचं आहे.) पण – भीम – हे ई वॉलेट नव्हे. तर आपल्या सामान्य बँकांमध्ये परस्पर व्यवहार करून देणारी पेमेंट सिस्टीम आहे. म्हणजेच भीम द्वारे होणारे व्यवहार, बँक अकाऊंट ते बँक अकाऊंट, थेट रूपयांतच होतात. वरील ३ व्यवहारांत भीमचा वापर केला तर क्लायंटच्या अकाऊंटमधील पैसे माझ्या बिझनेस अकाऊंट मध्ये जमा होतात. कुठलाही एजंट (पेटीएमसारखा) मध्ये नसतो. आणि ही व्यवहाराची सुविधा पूर्णपणे फु-क-ट आहे…! पण बिझनेसमध्ये फक्त फुकट असून भागत नाही. त्वरित आणि पारदर्शक असायला हवं. पेटीएम व्यवहार हातासारशी, चटकन होतात. लगेच मेसेज, पॉप अप येतात. भीमचं काय? तर – भीमद्वारे होणारे व्यवहारसुद्धा “तितकेच” फास्ट होतात. तश्याच नोटिफिकेशन्स येतात. फटाफट. नो डिले. उलट पेटीएम वॉलेट ते बँक अकाऊंट पैसे ट्रान्सफर होण्यासाठी १ दिवस लागतो. भीमला एक सेकंद. आणखी एक महत्वाचा फायदा – पेटीएम सारख्या ई वॉलेट्सद्वारे व्यवहार करायचे असतील तर पैसे “पाठवणाऱ्याकडे” आणि “घेणाऱ्याकडे” – दोघांकडे ते असणं आवश्यक आहे. पण भीमचं तसं नाही. पैसे पाठवणाऱ्याकडे भीम असणं पुरेसं आहे. ज्याला पाठवायचे आहेत,ऽ त्याचा बँक अकाऊंट नंबर आणि ifsc code घ्यायचा, भीमद्वारे पैसे पाठवायचे. विदीन अ सेकेंड, रक्कम इकडून तिकडे जमा होते. नेट बँकिंगवर लॉगिन करणे, बेनिफिशिअरी सेव्ह करणे वगैरे कटकट नाही. मुलाच्या ट्रीटमेंटचे पैसे तसेच पाठवले मी. दोघांकडे भीम असेल तर अतिउत्तम. तुमचा मोबाईल नंबर आणि/किंवा तुम्हाला आवडेल तो (आणि अव्हेलेबल असेल तो) upi पिन ठेवायचा. मग अकाऊंट नंबर, ifsc code लक्षात ठेवायची गरज नाही. “मोबाईल नंबर@upi” किंवा “तुमचा कोड@upi” ही तुमची id झाली. ही id टाकून तुम्हाला चटकन पैसे पाठवता येतात. एवढंच नव्हे, ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो समोर असेल तर upi पिन किंवा अकाऊंट, ifsc ची देखील गरज नाही. QR कोड स्कॅन करून थेट पैसे पाठवता येतात! (आणखी एक खास गोष्ट – भीमद्वारे पैसे “मागवता” सुद्धा येतात. म्हणजे एखाद्या माणसाकडून पैसे यायचे असतील तर “send” रिक्वेस्ट पाठवायची. त्याने मंजूर केली की पैसे जमा.) खरंतर, १० रुपयांच्या मिरची पासून १०,००० च्या मोबाईलपर्यंत सर्व व्यवहार सहज करता येईल इतकं सुंदर साधन आहे हे. पण सरकारने त्याची म्हणावी तशी जाहिरात, ओळख करून दिली नाही. त्यामुळे लोकांना भीम ही गोष्ट माहितीच नाहीये. किती सोपं आहे आणि किती फायदेशीर आहे हे माहीत नसल्याने लेस कॅश इकॉनॉमीचं हे ब्रह्मास्त्र तसंच भात्यात पडून आहे. हे सर्व लिहिण्यामागे पेटीएम किंवा तत्सम ई वॉलेटवर आकस अजिबात नाही. लोकांना माहिती नसलेला भीमचा पर्याय माहिती व्हावा बस्स हाच आणि एवढाच हेतू आहे. लेस कॅश इकॉनॉमी आवश्यक आहे, ह्यावर कुणाचंच दुमत नाही.

अगदी रिक्षावालासुद्धा आजकाल पेटीएमचे स्टिकर लावून फिरत असताना, त्याहून चांगला, सुटसुटीत आणि लोकांचे पैसे वाचवणारा हा पर्याय आहे. त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात सरकार कमी पडतंय. आपण ती कसर आपल्या परीने भरून काढुया, “भीम” बद्दल जागरूकता वाढवू.*

9:02 PM

 

अभिप्राय द्या!