गेल्या वर्षभरात काही कंपन्यांनी आपले समभाग विभाजित केले. स्टेट बँक , J & K बँक, tataMotor, भारत फोर्ज, drरेड्डी, या व अशा अनेकांनी ही कार्यवाही केली आहे. यासंबंधात अनेक समभागधारक अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. त्या सर्व प्रश्नांचा थोडा आढावा सोबत देण्यात येत आहे .
कंपनीच्या शेअर्सची किंमत जशी जशी वाढते तशी तशी त्या शेअर्सची शेअर बाजारात उलाढालसुद्धा वाढते. कंपनीचा विकास, वाढता व्यवसाय, नियमित होणारी नफ्यातील वाढ, असे अनेक घटक शेअर्सची बाजारातील किंमत वाढविण्यास मदत करतात. पण अशा वेळेला वाढलेल्या किमतीचा परिणाम त्या शेअरच्या उलाढालीवर होतो, शेअरची किंमत खूप वाढल्यामुळे लोकांना तो शेअर खरेदी करणे परवडत नाही जेणेकरून खरेदी वा विक्री मंदावते. अशा वेळेला कंपनी शेअर्सचे विभाजन/शेअर्स स्प्लिट करण्याचे जाहीर करते. स्प्लिट जाहीर झाल्यापासून स्प्लिट झालेले शेअर्स, डीमॅट खात्यात जवळपास ३ ते ६ महिन्यांत जमा होतात.
कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स स्प्लिटचे गुणोत्तर ठरवितात आणि त्यानंतर गुंतवणूकदारांची मंजुरी घेतली जाते. जसे कंपनीने २:१ (दोनास एक) या प्रमाणात स्प्लिट/विभाजन जाहीर केल्यावर, ज्यांच्याजवळ कंपनीचा १ शेअर आहे त्याला २ शेअर्स मिळतात. जर शेअरची दर्शनी किंमत १० रुपये असेल तर तीसुद्धा स्प्लिट झाल्यावर विभाजन गुणोत्तर जर दोनास एक असेल, तर पाच रुपये होते. म्हणजे जर स्प्लिट शेअरच्या दिवशी शेअर्सचा बाजारभाव रु. १००० असेल तर विभाजनानंतर तो ५०० रुपये होतो.
यामुळे कंपनीच्या निव्वळ मालमत्तेवर वा मार्केट कॅपिटलायझेशनवर काहीही परिणाम होत नाही. शेअर्सचा बाजारभाव कंपनीने स्वत:हून कमी केल्यामुळे शेअरची बाजारात उलाढाल मात्र वाढताना दिसून येते.
स्प्लिट शेअर्समुळे गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो ?
अल्पमुदतीचा विचार केल्यास फारसा परिणाम होत नाही. शेअर्सची संख्या वाढल्यामुळे प्रति शेअर उत्पन्न कमी होताना दिसते. परंतु एकूण लाभांश समभागाच्या बदललेल्या दर्शनी मूल्याप्रमाणे वाढलेल्या शेअर्समध्ये विभागला जाऊन, होणारा फायदा समान राहतो. उदा.: कंपनीला झालेल्या नफ्याचा बऱ्यापैकी भाग गुंतवणूकदारांना लाभांशाच्या स्वरूपात वाटला जातो आणि एवढेच नव्हे तर वर्षांतून वेळोवेळी अंतरिम लाभांशही दिला जातो. जर कंपनीने प्रति शेअर २०० टक्के अर्थात २० रु. लाभांश जाहीर केला असेल (शेअर्स स्प्लिट जाहीर होण्याच्या आधी) आणि स्प्लिट शेअर्सनंतर (२:१) गुंतवणूकदाराला प्रतिशेअर लाभांशसुद्धा विभागून मिळतो. जसे गुंतवणूकदाराकडे विभाजनाच्या आधी १०० शेअर्स असतील तर त्याला मिळणारा लाभांश २० रुपयांप्रमाणे एकूण (१०० गुणिले रु. २०) २००० रुपये मिळणे अपेक्षित आहे. परंतु स्प्लिट नंतर २:१ चे गुणोत्तर लक्षात घेता आता गुंतवणूकदाराकडे २०० शेअर्स झाले आहेत तर मिळणारा लाभांश बदललेल्या ५ रुपये दर्शनी मूल्यावर २०० टक्क्यांप्रमाणे १० रुपये होईल. तो त्या प्रमाणात २०० शेअर्ससाठी २००० रुपये एवढाच राहील याची गुंतवणूकदाराने नोंद घेणे आवश्यक आहे.
स्प्लिट शेअर्सचे फायदे काय?
१. स्प्लिट झाल्यावर शेअर्सची किंमत कमी होते आणि त्यामुळे तो सर्वाना परवडतो. शेअर्सची मागणी वाढते आणि त्यामुळे परत स्थिर झालेल्या उलाढालीला चालना मिळते.
२. शेअर्सची तरलता वाढणे हे गुंतवणूकदारांसाठी नेहमीच फायद्याचे असते आणि स्प्लिट शेअर्स तरलता वाढविण्यास मदतीचे ठरतात. जसे वरील उदाहरणात स्प्लिट शेअर्समुळे ५०० रुपयांचा शेअर्स आता प्रत्येकाला विकत घेणे परवडते. आणि त्याची तरलता वाढते. गुंतवणूकदाराला जर २००० रुपयांची गरज असेल तर केवळ ४ शेअर विकून त्याला गरज भागवता येते. पण स्प्लिट अॅक्शनच्या आधी त्याच्या किमान गरजेसाठी, पूर्ण ५००० रुपयांचा शेअर विकावा लागला असता. शिवाय किंमत जास्त असल्याकारणाने त्याला त्या शेअर्सच्या मागणीसाठी उदासीनता दिसून आली असती आणि शेअर विकणे जरासे अवघड बनले असते. या दृष्टिकोनातून बघितल्यास स्प्लिट फायदेशीर ठरते.
कंपनी आपले समभाग स्प्लिट करणार हे समजल्यास समभाग विकण्याची घाई करू नये. taxfree लाभांशाचा फायदा नक्की घ्यावा !!