‘मला नं, कर्जाबद्दल विचारायचय’ – दिवाळीचा फराळ आणत रमा यशोधराला म्हणाली.

‘खरं तर मी तुम्हाला बँकेतच भेटायला पाहिजे, नाही क?’ – तिनं थोडं अपराधीपणेच विचारलं. ‘पण मी म्हटलं आता स्वामीजींच्या आश्रमात गेली वर्षभर ओळख आहेच आपली, शिवाय त्यानिमित्त तुमचं येणसुद्धा होईल’.

‘नाही गं, काहीच अडचण नाही. अगं बऱ्याचदा बँकेत गर्दी असते. नीट सवडीने बोलताच येत नाही’- यशोधरा मॅडम हसत म्हणाल्या. ‘आणि स्वामीजी म्हणतातच ना… बायकांनो, पैशाचे विषय तुमच्या मैत्रिणींच्या गप्पात आणि किटी पार्ट्यांतपण यायला पाहिजेत.’

यशोधरा मॅडम विकेंडला वर्ग घ्यायच्या; पण त्या एका सरकारी बँकेत मॅनेजर होत्या आणि त्यांचे वर्ग आणि त्यानंतरच्या गप्पा सगळ्या साधकांत लोकप्रिय होत्या.

‘नाही, काय आहे, मी आणि माझी बहीण, आम्ही दोघीही सध्या कर्ज घ्यायचा विचार करत होतो’ – सोबत आलेल्या सीमाकडे बोट दाखवत रमा म्हणाली.

‘म्हणजे ताईला होम लोनच हवंय; पण आमचा एक छोटा बिझनेस आहे आणि माझा त्यासाठी कर्ज घ्यायचा विचार होता’- सीमाने पुस्ती जोडली

‘नाही पण काय होतं, की आमच्या बाबांनी आयुष्यात कर्ज नाही काढलं, ते म्हणतात हे कसले ऋण काढून सण करायचे डोहाळे लागले तुम्हाला!’- रमा म्हणाली.

‘हं, हे खरं आहे की नव्वदीच्या दशकाआधी कर्ज घेण्याची फारशी पद्धत नव्हती मध्यमवर्गात. पण आता तसं काही उरलेलं नाही. मुळात काय आहे की, कर्ज म्हणजे भिक नव्हे, तुमच्यासारखीच बँकेला आणि खरंतर अर्थव्यवस्थेलाच त्याची गरज असते.’

‘बँकेला ठीक आहे, कारण तिचं त्यात उत्पन्न आहे. पण अर्थव्यवस्थेला?’ – आश्चर्याने सीमा म्हणाली.

‘हो तर. अगं कसं आहे की, समजा तू उद्योगासाठी कर्ज घेतल, की लोकांनी नुसतीच बचत केलेली रक्कम बँक उत्पादनात आणेल, शिवाय तुला व्याज आणि हप्ता भरायचाच आहे. त्यामुळे तू तुझ उत्पादन करून, मला विकून पैसा कमवायचा प्रयत्न करणार. तो व्याजाच्या/हप्त्याच्या रकमेहून जास्तच नाही का?’

‘ते खरं आहे हो; पण नाही झाला धंदा आणि आणि फेडता आलं, तर?’

‘आता असं आहे की, व्यवसाय म्हटला की जोखीम येतेच गं. पण ती समजायची असेल तर बँक कधी कर्ज देते हेही जाणून घ्यायला हवं!’

‘कर्ज देताना बँकेचे तीन निकष असतात. पहिला म्हणजे तुमचा इतिहास! म्हणजे यापूर्वी तुम्ही कोणती कर्ज घेतली, किती आणि कशी परतफेड केली? काही कर्ज थकवलेली आहेत का? या सगळ्यावरून तुम्हाला कर्ज द्यायचा की नाही, हे ठरवणं बँकेला सोयीच जात.’

‘पण, समजा याविषयी आपण नाहीच खरं काय ते बँकेला सांगितलं तर?’ – सीमान चेष्टेने विचारलं.

‘तेवढं सोपं नाही बरं’ – मॅडम हसत म्हणाल्या. ‘तुमच्या या सगळ्या कर्जाशी संबंधित व्यवहारांची माहिती सिबील, म्हणजे क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरो नावाच्या संस्थेकडे आपोआप जात असते. आणि या सगळ्या सगळ्या ‘इतिहासा’वरून तुम्हाला तपासलं जात असतं. तुम्हीसुद्धा काही माफक पैसे भरून या सिबिलकडे तुमची काय माहिती आहे, ते तपासू शकता.’

‘दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ‘तारण’. तुम्ही कर्ज घेताना ते परत फेडू शकला नाहीत तर तुमची कोणती मालमत्ता आहे जी विकून बँक आपली वसुली करू शकेल? ते आहे तारण! तुमचं तारण बाजारात काय किमतीचं आहे आणि तुम्हाला किती कर्ज हवं आहे, याचं काही प्रमाण ठरलेलं आहे. आणि अर्थात जास्त किमतीचं तारण असेल तर नक्की कर्ज जास्त आहे’.

‘पण जर कोणाकडे अशी मालमत्ता नसेल तर?’ – सीमानं साशंकपणे विचारलं.

‘तर मग ज्यांच्याकडे आहे, त्यांनी हमी द्यायला म्हणजे गॅरेण्टी म्हणून उभं राहिलं पाहिजे.’

‘म्हणजे, मी उभी राहू शकेन हिला गॅरेण्टी म्हणून?’ – रमा उत्साहात म्हणाली.

‘हो देऊ शकशील नं. पण राग मानू नका. तुम्ही बहिणीच आहात. पण अशा प्रकारे गॅरेण्टी देताना दहावेळा विचार करा. काय आहे, अगदी प्रामाणिक कारणामुळे जरी सीमा कर्ज फेडू शकली नाही तर बँक तुझ्यामागे नक्की लागेल . काय होतं, आर्थिक निर्णय हे भावनेच्या भरात घेतले जातात. बहिणीने नक्की बहिणीच्या मदतीला उभं राहावं. पण त्याचबरोबर व्यवहार नीट समजून मगच काय ते कराव.’

‘ते खरं आहे’ – सीमा स्वतःशीच म्हणाली. ‘पण तिसरी गोष्ट ती काय?’

‘तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं संभाव्य उत्पन्न. अर्थात प्रोजेक्टेड कॅश फ्लोज. भविष्यात तुम्ही काय आणि कधी कमवून कर्ज फेडू शकता, याचे ठोकताळे.’

व या निकषावरच किती कर्ज मिळणार हे निश्चित होते .

बँक असो वा पतसंस्था असो कर्ज मंजुरीची पद्धत कशीही असो निकष हेच असतात . व वसुलीचे नियम कमी जास्त प्रमाणात कडकच असतात !!

अभिप्राय द्या!