डेट फंडाचे वेगवेगळे प्रकार

* लिक्विड फंड : यात अगदी १ दिवसासाठी गुंतवणूक केली जाऊ  शकते. या प्रकारच्या म्युचुअल फंड योजना अगदी बँकेतील बचत खात्यासारखे असतात. यात गुंतवणूक करणे हे काही मोठी रक्कम काही दिवसांसाठी बाजूला आहे अशांना तसेच लहान व्यवसायिकासाठी फायद्याचे ठरू शकते. या प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये मनी मार्केट पेपर्स व ट्रेझरी बिल यासारख्या पर्यायांत गुंतवणूक केलेली असते, ज्याची मुदत ही १ दिवस ते ३ महिने इतकी असू शकते. हा म्युच्युअल फंडामधील अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.

* अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड : १ ते ९ महिन्यांसाठी योग्य. पूर्वी या प्रकारच्या म्युच्युअल फंडाला लिक्विड प्लस म्हटले जात असे. कारण याचा गुंतवणूक कालावधी हा लिक्विड फंडांपेक्षा थोडा जास्त असतो व उपयोग लिक्विड फंडासारख्या गुंतवणुकीसाठी परंतु फक्त ज्याचा कालावधी थोडा अधिक असेल अशासाठी केला जातो.

* शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म फंड : यात ६ महिने ते ९ महिन्यांपर्यंत कालावधीसाठी गुंतवणूक केली जाऊ  शकते. याच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक मुदतीचे पेपर्स असतात. व्याजदरातील चढ-उताराचा प्रभाव या गुंतवणूक पर्यायांत होऊ  शकतो. बाजारात जर व्याजदर वाढले तर हा फंड चांगला परतावा देऊन जातो. ज्यांची जोखीम क्षमता कमी आहे अशांसाठी हा पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य आहे.

* लाँग टर्म फंड आणि इन्कम फंड : १ ते ३ र्वष मुदतीसाठी हा गुंतवणूक पर्याय योग्य आहे. या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये बँक एफडी, कंपन्यांच्या एफडी, कंपन्यांचे बाँड, सरकारी मुदत ठेवी असे पेपर्स असतात.

या प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घ्यावी. कारण यातील पेपर्स हे जास्त मुदतीचे असल्यामुळे त्या कालावधीचा विचार करूनच गुंतवणूक करावी. लवकर गुंतवणूक काढून घेतल्यास परतावा कमी मिळू शकतो किंवा तोटाही सहन करावा लागू शकतो.

*  गिल्ट फंड : ३ ते ५ र्वष किवा अधिक. या प्रकारच्या फंड पोर्टफोलिओमध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारमार्फत जारी केले जाणारे कर्जरोखे (बाँड) यामध्ये गुंतवणूक असते. सरकारी पेपर्समध्ये गुंतवणूक असल्यामुळे ही गुंतवणूक सुरक्षित जरी असली तरी बाजारातील व्याजदराच्या चढ-उताराचा जास्त प्रभाव असल्यामुळे गुंतवणुकीच्या मुदतीचा विचार करूनच यात गुंतवणूक करावी.

अभिप्राय द्या!