सामान्य गुंतवणूकदारांसाठी बँक FD हा नेहमीच पर्याय राहिलेला आहे. भारतीय बँकामध्ये सध्या एकूण सुमारे १,१५,००० कोटींच्या पेक्षा जास्त ठेवी आहेत.
बँकांवर असलेला विश्वास, सोय,मुद्दलाची सुरक्षितता ,व्याजदराची निश्चिती या मुख्य कारणांमुळे सर्व आर्थिक स्तरातील गुंतवणूकदारांचा ओढा बँक FD कडे राहिलेला आहे.
पण सध्याच्या घसरत्या व्याजदराच्या काळात मात्र हा पर्याय तेवढासा आकर्षक राहिलेला नाही.
परंतु खरं तर हा पर्याय कधीच तितकासा फायदेशीर नव्हता. फक्त आजच्या ६.५% व्याजापेक्षा ४-५ वर्षांपूर्वीचा १०% – १०.५% व्याजदर जास्त वाटतोय. एवढाच काय तो फरक.
कारण आज सरकारी आकडेवारीनुसार महागाईचा दर हा ४.५% – ५% आहे. तोच ४-५ वर्षांपूर्वी ८.५%- ९% होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना नेहमीच केवळ १% – १.५% ( बँक FD – महागाईचा दर ) एवढचं उत्पन्न मिळत आलेलं आहे. आणि हीच स्थिती पुढेही राहण्याची शक्यता आहे.
कारण महागाईचा दर नियंत्रित ठेवण्यासाठी बँकांचे व्याजदर कमी – जास्त करणे हे रिझर्व बँकेचे एक प्रमुख आणि प्रभावी हत्यार असते.
त्यामुळे बँक FD मध्ये आपण १००/- रु. ठेवलेत आणि १ वर्षांनी आपल्याला ११०/- रु. मिळाले तरी आपली गरज महागाई मुळे वाढून १०८/-रु. ते १०९/-रु. इतकी झालेली असेल.म्हणजेच कमाई किती ?
सध्या बँक FDचे गुंतवणूकदार आपला FD चा पैसा काढून शेअर बाजाराकडे वळताहेत. ही एक मोठी गोष्ट आहे. मात्र ही एक मोठी चूक ठरू शकते. अशासाठी की आजपर्यंत आपण बँक FD सारख्या स्थिर , निश्चित व्याज देणाऱ्या गुंतवणूक साधनामध्ये आपली रक्कम ठेवत होतात. तुम्हाल त्या स्थैर्याची सवय आहे. त्याच्या अगदी विरुद्ध शेअर बाजार हा प्रचंड चलनक्षम आहे.(अस्थिर शब्द चुकीचा ठरेल). त्यात क्षणोक्षणी बदल होत असतात.
त्या ऐवजी मुच्युअल फंडातील डेट फंड हा पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
डेट फंड हे कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. तुमची बँक FD म्हणजे तुम्ही बँकेला दिलेलं एक प्रकारे कर्जच होय. म्हणूनच बँक तुम्हाला व्याज देते.
तसेच केंद्र सरकार , राज्य सरकार, NABARD, NHAI सारख्या मोठ्या वित्तसंस्था, टाटा , बिर्ला सारख्या मोठ्या कंपन्या हे देखील कर्ज घेतात. हा सर्व व्यवहार रिझर्व बँकेच्या माध्यमातून चालतो.
मुच्युअल फंडातील डेट फंड हे अशाच प्रकारच्या कर्जांमध्ये गुंतवणूक करतात. याचा फायदा असा या मधील गुंतवणूक ही शेअर बाजार किंवा त्यामध्ये गुंतवणूक करणारे मुच्युअल फंड या पेक्षा तुलनेने खूपच स्थिर असते. आणि बँक FD पेक्षा १% ते १.५% जास्त उत्पन्न कमावून देऊ शकते. शिवाय ३ वर्षापेक्षा जास्त काळ थांबल्यास अत्यल्प TAX लागतो. तसेच अत्यल्प चार्ज देऊन हवे तेंव्हा आपले पैसे काढण्याचीही सोय आहे.
सध्या बँक FDचे गुंतवणूकदार आपला FD चा पैसा काढून शेअर बाजाराकडे / मुच्युअल फंडाकडे वळताहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र योग्य प्रकारे गुंतवणूक न झाल्यास त्याचा गुंतवणूकदाराच्या आर्थिक नियोजांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांमुळे हा निर्णय घेतांना आर्थिक सल्लागाराची मदत घेणे कधीही फायदेशीर ठरेल. अन्यथा आपला कष्टाचा पैसा आनंद देण्या ऐवजी त्रासदायक ठरू शकतो , निराशा देऊ शकतो. शेवटी गुंतवणूक केल्यानंतर सुखाची झोप येणेही महत्वाचे आहे. नाही का ?
प्रशांत वि. जोगळेकर
असोसिएट फायनान्शियल प्लानर
9822455233 / 8552010770