न सांगून येणाऱ्या आर्थिक अडचणींचे निरसन करण्यासाठी एखादा आपातकालीन निधी बाजूला काढून ठेवलाच पाहिजे, आगामी सहा महिन्यांमधील अनपेक्षित खर्चांची तजवीज होईल, इतकी रक्कम आपात्कालीन निधीत असणे आवश्यक आहे. अनेकांकडून याची अंमलबजावणी होईलच, असे काही नाही.
अशा आर्थिक अडचणीच्या वेळी बचत किंवा शिलकीत काहीही नसले, तरी गांगरून जाण्याची आवश्यकता नाही. गरजेच्या प्रसंगी आर्थिक अडचण निर्माण झाल्यास त्यावर मात करणारी अनेक साधने आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

मात्र, अशी रक्कम कर्जाऊ घेताना खरीच निकड आहे, का याची चाचपणी करणे आवश्यक आहे. रक्कमही घेताना ती कमीतकमी असावी, याचे भानही राखणे आवश्यक आहे. ही रक्कम कर्जाऊ असल्याने निर्धारित मुदतीत ती परतफेडही करणे आवश्यक आहे. ही रक्कम वेळेत परतफेड न केल्यास तुम्हाला दंड आणि त्यावरील व्याजही भरावे लागेल, हे लक्षात असू द्या…

तुमच्या कंपनीकडून कर्ज उचला
आपातकालीन निधीची आवश्यकता भासल्यास सर्वप्रथम तुम्ही जेथे नोकरी करता, त्या कंपनीची मदत घ्या. बहुतांश कंपन्या पुढील महिन्याच्या वेतनापैकी काही टक्के रक्कम अॅडव्हान्स म्हणून देतात, अशी माहिती वित्तीय सल्लागार पी. व्ही. सुब्रह्मण्यम यांनी दिली. अॅडव्हान्स म्हणून मिळणारी रक्कम एक ते सहा महिन्यांच्या टेकहोम पगाराइतकी असू शकते. ती तुमच्या तीन ते २४ महिन्यांच्या वेतनातून वळती केली जाऊ शकते.

टॉप अप लोन
तुम्ही गृहकर्जधारक आहात का? असल्यास तुम्ही तुमच्या बँकेकडून कमाल वीस वर्षांच्या मुदतीसाठी पन्नास लाख रुपयांपर्यंतचे टॉप अप लोन घेऊ शकता. मूळ गृहकर्जफेडीसाठी किती वर्षे शिल्लक आहेत, तेवढ्या वर्षांच्या मुदतीचेही टॉप अप लोन घेता येते. तुम्ही काही वर्षांसाठी नियमित गृहकर्जाचे हप्ते फेडत असाल तरच, तुम्हाला टॉप अप लोनचा लाभ घेता येतो.

मालमत्ता तारण कर्ज

जर तुमच्याकडे स्वमालकीचे घर असेल तर, ते गहाण ठेवून त्याच्यावर तुम्हाला दीर्घमुदतीचे कर्ज मिळू शकते. त्यालाच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असेही म्हटले जाते. घराच्या बाजारमूल्यावर हे कर्ज पाच लाखांपासून १० कोटी रुपयांपर्यंत मिळू शकते. या कर्जाचा कालावधी दोन ते पंधरा वर्षांचा असू शकतो. निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाच्या मालमत्तेवरही कर्ज घेता येऊ शकते. मालमत्तेच्या एकूण किमतीच्या ६५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. मात्र, या घराचा विमा काढणे आवश्यक ठरते. त्यासाठी दीड ते दोन टक्के प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) आकारले जाऊ शकते.

शेअरवर कर्ज
तुमच्याकडे शेअर, म्युच्युअल फंड, बँकांच्या मुदतठेवी किंवा इन्शुरन्स पॉलिसी असतील तर त्यावरही कर्ज प्राप्त होऊ शकते. म्युच्युअल फंड, शेअरच्या बदल्यात एकूण किमतीच्या पन्नास टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. या उलट बँकेतील मुदत ठेवींच्या बदल्यात एकूण रकमेच्या ७५ टक्के कर्ज मिळू शकते.पोर्टफोलिओची किंमत घसरू लागली तर, तुम्हाला मिळणारी कर्जाची रक्कम घटू शकते.  ==  व्याजदर : ९ ते १५ टक्के

क्रेडिट कार्डवरील कर्ज
एटीएममध्ये जाऊन क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेतले जाऊ शकते. तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण मर्यादेच्या ४० ते ८० टक्के रक्कम कर्जाऊ मिळू शकते. असे असले तरी दररोज किती रक्कम काढावी, याची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. प्रत्येक बँकेनुसार दैनंदिन रक्कम काढण्याची मर्यादा बदलते.

प्रक्रिया शुल्क म्हणून कर्जाच्या अडीच ते तीन टक्के रक्कम वसूल केली जाऊ शकते. शिवाय कर्ज घेतलेल्या दिवसापासून पूर्ण कर्जफेड करेपर्यंत संपूर्ण व्याज वसूल केले जाऊ शकते.==व्याजदर : दरमहा २ ते साडेतीन टक्के

पसर्नल लोन (वैयक्तिक कर्ज)
कर्जाऊ रक्कम उभारण्याचा कमी कालावधीचा पर्याय म्हणून पर्सनल लोनकडे पाहिले जाते. अर्धा तास ते तीन दिवसांच्या कालावधीत कर्ज हाती पडू शकते. त्यासाठी तुमचे आणि बँकेचे संबंध कसे आहेत, हे देखील पाहिले जाते. त्यासाठी तुमच्या नावावर बँकेचे आधीपासूनचे किमान एक कर्ज असणे आवश्यक आहे. तरच, कर्जाची प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होते.

उच्च व्याज दर आणि किमान दोन ते तीन टक्के प्रक्रिया शुल्क आकारले जाऊ शकते. शिवाय कर्जाच्या सुलभ हप्ते फेडताना त्यावर जीएसटी भरणे क्रमप्राप्त आहे. मुदतीच्या आत कर्जाची परतफेड केल्यास उर्वरित रकमेवर अडीच टक्के दराने शुल्क भरावे लागते.==व्याजदर : १३ ते २४ टक्के

  सोन्यावर कर्ज
तुमच्याकडील सोन्याच्या एकूण किमतीच्या ६० टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. कर्जाऊ रक्कम दहा हजार रुपयांपासून २५ लाखांपर्यंत असू शकते. साधारणपणे हे कर्ज ६ ते बारा महिने कालावधीचे असते. मात्र, या कर्जाचा व्याजदर अतिशय कमी असतो. या कर्जाची परतफेड गरजेनुसार अंशतः करता येते. पूर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतरच सोने तुमच्या ताब्यात दिले जाते.

गोल्ड अप्रेझल चार्जेस म्हणून २५० ते २५०० रुपये आकारले जाऊ शकतात. कर्जदाराला कर्ज फेडण्यात अपयश आल्यास सोने जप्त केले जाते.

ह्या सुविधा मात्र आपत्कालीन स्थितीतच वापरणे उचित आहे !!!
 

अभिप्राय द्या!