अनेक गुंतवणूकदारांना स्वतःच्या उत्पन्नाविषयी, आर्थिक गरजांविषयी अनेक जणांशी बोलायला आवडत नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब असल्याने त्यांना संकोच वाटतो. त्यामुळे ही वैयक्तिक बाब सार्वजनिक न करता आर्थिक गरजांविषयी योग्य मार्गदर्शन करणारा सल्लागार त्यांना हवा असतो. अशावेळी पक्षपात न करता सल्ला देणारा वित्त सल्लागार निवडावा.

तुमचा पैसा ज्याच्या हाती तुम्ही सोपवणार आहात तो वितरक सहजगत्या उपलब्ध असावा. तुमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे लवकरात लवकर त्या सल्लागाराने किंवा त्यांच्या चमूने द्यायला हवीत. ही उत्तरे देताना तुम्ही ईमेल, फोन कॉल, एसएमएस असे जे संपर्क माध्यम निवडले आहे, त्याला तो सल्लागार सरावलेला असावा. आर्थिक जगात वेळेला सर्वोच्च महत्त्व असते. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे निर्णय त्याने चटकन किंवा निर्धारित वेळेत घेणे गरजेचे आहे.

शिक्षण व अनुभव या निकषांवर वितरक पात्र ठरतो का ते पाहावे. म्युच्युअल फंड सल्लागाराला इक्विटी, फिक्स्ड इन्कम व सोने अशा वेगवेगळ्या मत्ता गटांचे ज्ञान असावे. या मत्ता गटांवर देशी व आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम कशा प्रकारे होईल, याचा अंदाज त्याला व त्याच्या चमूला घेता येणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी व गरज पडल्यास उपयोगी पडण्यासाठी नेमक्या कोणत्या योजना तुम्हाला देता येतील, हे ओळखण्याची क्षमता त्या सल्लागाराकडे असावी.

तसेच सल्ला देण्यासाठी त्याने आपला मेहनताना सांगितल्यास तो देण्यामध्ये तुम्होसुद्धा काटकसरीचे धोरण ठेऊ नये !!

 

अभिप्राय द्या!