सहकारी बँकेत किंवा पतसंस्थेत  गुंतवणूक करण्याआधी संबंधित संस्थेची आर्थिक स्थिती  कशी आहे, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. त्याविषयी अनेकांना माहिती नसते. बँकेच्या अनुत्पादक कर्जांचे प्रमाण (एनपीए), भांडवल पर्याप्तता, नफा आणि ठेवींच्या प्रमाणात कर्जवाटपाचे प्रमाण किती आहे, या चार गोष्टींची माहिती घेतल्याशिवाय कोणत्याहीसंस्थेत गुंतवणूक करू नये.

अशा संस्थेचे एनपीएचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आतच असले पाहिजे. भांडवल पर्याप्तता ही नऊ टक्क्यांपेक्षा अधिक असली पाहिजे. बँकेला मागील तीन वर्षांत नफा झालेला असावा, तर कर्जवाटपाचे प्रमाण (सीडी रेशो) जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंत असावे. हे चारही घटक योग्य प्रमाणात असतील, तरच ती संस्था  गुंतवणूक करण्यास योग्य आहे असे समजावे.

बहुतांश वेळा आपण  ठेवींवरचा व्याजदर पाहून जिथे जास्त व्याज मिळते, तिथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतो; परंतु त्या ऐवजी हि संस्था कर्जावर किती व्याजदर आकारते, हे पाहणे आवश्यक आहे. चढ्या व्याजदराने कर्ज घेणाऱ्या व्यक्तींकडून कर्ज फेडले जाण्याच्या शक्यतेबाबत शंका घेण्यास जागा असते. इतरत्र कर्ज न मिळाल्याने ते चढ्या व्याजदराने कर्ज घेण्यास तयार होतात. ‘जास्त व्याजदर म्हणजे जास्त धोका’ हे कायम लक्षात ठेवावे.

ठेव ठेवण्याआधी ठेवींवर मिळणारा व्याजदर, बँकेकडील तरलता (लिक्विडिटी), आणि धोका या तीन गोष्टींची पडताळणी करावी. धोक्याला ८० टक्के महत्त्व द्यावे, ठेवींवर मिळणारे उत्पन्न आणि बँकेची तरलता याला प्रत्येकी दहा टक्के महत्त्व द्यावे.
सहकारी बँकांमध्ये एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा कवच असते. त्यामुळे गुंतवणूक करताना एक लाख रुपयांची ठेव ठेवावी. अधिक रक्कम ठेवायची असल्यास घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक एक लाखांची ठेव ठेवावी किंवा नावांचा क्रम बदलून संयुक्त नावानेही एक लाख रुपयांची ठेव ठेवता येईल.

योग्य माहिती घेऊन, विभागून गुंतवणूक केल्यास आपले पैसेही सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगले उत्पन्नही मिळेल.

अभिप्राय द्या!