कालच बालदिन झाला आहे ! बालदिनाच्या निमित्ताने लहानांना काय संदेश द्यावा ह्याचा विचार गेले दोन दिवस मनात होता. पण बालकांना संदेश देण्याऐवजी पालकांनाच संदेश द्यावा असे मनात आल्याने लगेच लिहायला घेतले. नाहीतरी प्रत्येक माणसाच्या मनात एक बालक असतोच ना !!
तुमचं मूल अन्य शहरात शिक्षणासाठी जाणार असेल तर त्याला सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांची सवय आहे ना ते पहा. बँकेची स्टेटमेंट ऑनलाइन वाचता येणे, ऑनलाइन व्यवहार करता येणे, एटीएममधून व्यवहार करता येणे हे सर्व त्याला करता येते का याची शहानिशा करावी. त्याला चित्रपटाचे तिकिटही ऑनलाइन बुक करता यायला हवे! तसेच टॅक्सीसेवाही ऑनलाइन बुक करता यायला हवी. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्व ऑनलाइन व्यवहारांसाठी मोबाइल सुरक्षा कशाप्रकारे ठेवावी, पासवर्ड कसे ठेवावेत हेदेखील त्याच्या लक्षात यायला हवे. वनटाइम पासवर्ड (ओटीपी), यूफॅक्टर ऑथेन्टिकेशन, सीव्हीव्ही या तांत्रिक संज्ञा त्याच्या लक्षात यायला हव्यात. त्याचप्रमाणे डेबिट, क्रेडिट व प्रिपेड कार्ड यांतील फरकही त्याला समजायला हवा.
कुमारावस्थेत खर्च करण्याविषयी मित्रांचा दबाव कसा वाढतो, दुसऱ्याचे ऐकून खर्च करण्याची मनोवृत्ती कशी वाढते, यातून मग बिटकॉइनसारख्या गुंतवणूक माध्यमांचे आकर्षण कसे निर्माण होते याचीही माहिती तुम्ही तुमच्या अपत्याला द्यायला हवी. त्याचप्रमाणे त्याला त्याच्या मित्रांना पैसे उसने देण्यापासून परावृत्त करायला हवे. तुझ्या मित्राने तू त्याला दिलेले पैसे परत दिले नाहीत तर तू आर्थिक संकटात येशील याची स्पष्ट जाणीव त्याला करून द्यायला हवी. तसेच तुझी व त्या मित्राची मैत्री कायमची संपेल हेदेखील सांगायला हवे. त्याऐवजी मित्रांमध्ये जो खर्च होईल तो वाटून घ्यावा हे सांगायला हवे. तसेच कोणताही पासवर्ड कुणालाही सांगू नये याकडेही त्याचे लक्ष वेधायला हवे.
अंदाजपत्रककरणे व त्यानुसार वागणे हे खूप प्राथमिक आहे. परंतु अनेक आर्थिक समस्या निर्माण होण्याचे मूळ हे अंदाजपत्रक न पाळण्यामध्ये आहे. विशेषतः मूल एकटे राहायला लागल्यावर व स्वतःच्या पैशाचे स्वतःच व्यवस्थापन करू लागल्यावर तर अंदाजपत्रक पाळण्याची सवय त्याच्या फारच कामी येते. घर सोडून दुसरीकडे राहायला जाण्यापूर्वी काटेकोर अंदाजपत्रक आखण्याची सवय त्याला लावायला हवी. यामुळे त्याच्या प्रत्येक आर्थिक कृतीला तोच जबाबदार राहील, पैसा हाताळण्याची कला त्याला अवगत होईल जेणेकरून महिनाअखेर त्याच्याजवळ पैसा न राहण्याची स्थिती उरणार नाही आणि मग त्याला कोणाकडून पैसे उसने घेण्याची गरजची भासणार नाही.
व ह्या सर्व सवयी लहान वयातच लावल्याने आपले मुल मोठे होण्यापूर्वीच अर्थसाक्षर झालेले आपल्याला पाहता येईल !!