गुंतवणूकदाराला आयुष्यभरासाठी म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ करता येते का आणि ती कशी केली जाते? 
अशी ‘एसआयपी’ करता येते आणि अशा गुंतवणुकीला ‘पर्पेच्युअल एसआयपी’ म्हणजे निरंतर एसआयपी म्हणतात. नेहमीच्या एसआयपी गुंतवणुकीत आपण गुंतवणुकीचा कालावधी निवडतो. उदाहरणार्थ, एक वर्ष, तीन वर्षे, पाच वर्षे आदी. म्हणजेच आपण एसआयपी गुंतवणूक सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख ठरवतो. परंतु, एसआयपी फॉर्म भरताना एसआयपी संपण्याची तारीख नमूद केली नाही, तर गुंतवणूकदाराला ती एसआयपी बंद करायची नाही, असा अर्थ घेतला जातो आणि ही एसआयपी वर्ष २०९९ पर्यंत सुरू राहते. काही म्युच्युअल फंड कंपन्यांच्या फॉर्ममध्ये ‘पर्पेच्युअल एसआयपी’ असा स्वतंत्र पर्याय असतो आणि इच्छुक गुंतवणूकदार तो निवडू शकतात.

 ‘पर्पेच्युअल एसआयपी’ कोणी करावी? व फायदे काय आहेत?
– ज्यांना एसआयपी गुंतवणुकीचे फायदे लक्षात आले आहेत, अशा गुंतवणूकदारांनी ‘पर्पेच्युअल एसआयपी’चा विचार अवश्‍य करावा. विशेषतः तरुण गुंतवणूकदारांनी अशी गुंतवणूक करणे योग्य ठरते. तसेच, ज्या गुंतवणूकदारांकडे गुंतवणुकीसाठी २०-२५ वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे, अशा गुंतवणूकदारांनी देखील अशा पद्धतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. इतर एसआयपीप्रमाणे ‘पर्पेच्युअल एसआयपी’मध्येसुद्धा वारसदाराचे नाव नमूद करता येत असल्यामुळे दुर्दैवी घटना घडली, तरी वारसदाराला रक्कम मिळण्यात अडचण येत नाही.

म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीत अनेक गुंतवणूकदार १ ते ३ वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करताना दिसतात. वेगवेगळ्या कारणांमुळे या एसआयपीचे नूतनीकरण केले जात नाही. यामध्ये गुंतवणूकदाराने केलेला कंटाळा हे प्रमुख कारण दिसून येते. याशिवाय बाजारात तेजी असताना सुरू केलेल्या अशा छोट्या कालावधीच्या एसआयपी बाजार पडल्यानंतर फारशा आकर्षक वाटत नाहीत. खरे तर बाजार पडल्यानंतर गुंतवणुकीची संधी असताना एसआयपी बंद असल्याने गुंतवणुकीचा मूळ हेतू बाजूला पडू शकतो. ‘पर्पेच्युअल एसआयपी’मध्ये हे सर्व टाळता येते. शेअर बाजाराच्या प्रत्येक हेलकाव्यामध्ये गुंतवणूक सुरू असल्याने दीर्घकाळात उत्तम परतावा मिळू शकतो. उदाहरणार्थ, दरमहा पाच हजार रुपयांची एसआयपी नियमितपणे तीस वर्षे सुरू ठेवल्यास तीस वर्षांनंतर आपल्या गुंतवणुकीचे मूल्य जवळजवळ साडेतीन कोटी रुपये एवढे होते. या ठिकाणी वार्षिक परतावा पंधरा टक्के मानला आहे. या तीस वर्षांत गुंतवणूक केलेली रक्कम अठरा लाख रुपये एवढीच आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

हे करताना काय काळजी घ्यावी?
– ‘पर्पेच्युअल एसआयपी’ करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य फंडाची निवड करणे. कारण एवढ्या मोठ्या कालावधीसाठी चुकीच्या फंडाची निवड झाल्यास अपेक्षित फायदा मिळणे अवघड होते. तसेच, गुंतवणूक सुरू करण्याआधी आपल्याला गुंतवणुकीतील नियमितता पाळता येईल की नाही याची खातरजमा करावी. अर्थात, काही कारणांनी अशी एसआयपी सुरू ठेवणे शक्‍य झाले नाही, तर गुंतवणूकदार ती एसआयपी कधीही बंद करू शकतो.

अभिप्राय द्या!