बाजारात उपलब्ध असलेले जुने फंड महाग वाटत असल्यामुळे साहजिकच गुंतवणूकदार इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत नव्या योजनांकडे आकर्षित होतात. अशा वेळी पुढील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.

१) म्युच्युअल फंडाच्या दर्शनी किमतीला स्वतःचे अस्तित्व नसते. ज्या शेअरमध्ये आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये त्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूक असते, त्यांच्यातून होणाऱ्या फायद्यावर सर्व काही अवलंबून असते. म्हणूनच जुन्या म्युच्युअल फंडाची किंमत (मूल्य) अधिक असेल, तर तो ‘महाग झाला आहे,’ असे म्हणून टाळणे योग्य नव्हे.

२) थोडक्‍यात, फंडाची गुंतवणूक संकल्पना काय आहे, त्याच्याकडे किती मालमत्ता आहे आणि त्या फंडाचे खर्च किती आहेत, या गोष्टीही गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या आहेत. या तीनही निकषांवर जुने फंड सरस ठरताना दिसतात. फंडाची ‘एनएव्ही’ किती आहे, हा निवडीचा निकष होऊ शकत नसल्यामुळे ‘एनएव्ही’ला अवास्तव महत्त्व देण्याचे टाळावे.

३) याशिवाय नव्या म्युच्युअल फंडाच्या खरेदीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे युनिट्‌स मिळतातच. नव्या शेअरच्या ‘आयपीओ लिस्टिंग’च्यावेळी अधिक मागणी व मर्यादित पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार संबंधित शेअरचे भाव एकाच दिवसात वर जाऊ शकतात. त्याप्रमाणे नव्या म्युच्यअल फंडाची किंमत चटकन वाढत नाही.

४) नव्या फंडाचा अभ्यास करताना (जुन्या फंडांप्रमाणे) त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा अभ्यास देखील करता येत नाही; तसेच त्यांचे मानांकन देखील झालेले नसते. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला त्या फंडाचा सखोल अभ्यास करणे अवघड जाते.

५) कमी किमतीत मिळणारे नवे फंड एका मुद्द्यावर मात्र सरस ठरू शकतात. अशा फंडाने जर लाभांश दिला, तर त्याचा ‘यील्ड’ उत्तम मिळतो. कारण जुन्या फंडांच्या बाबतीत असा लाभांश दर्शनी मूल्यावर (दहा रुपये) मिळत असल्याने ‘यील्ड’ खूप कमी मिळतो. अर्थात, नव्या फंडाकडून लगेच लाभांशाची अपेक्षा करणे देखील चुकीचे असते. त्यामुळे या ठिकाणी देखील गुंतवणूकदारांची निराशा होऊ शकते.

नव्या फंडाने जर आतापर्यंत अमलात न आणलेली एखादी नावीन्यपूर्ण गुंतवणूक संकल्पना समोर आणली असेल, तर ती पारखून घ्यायला हवी आणि मगच अशा फंडाचा आपल्या भात्यात समावेश करायचा का नाही हे ठरवावे; अन्यथा ‘जुने ते सोने’ हे लक्षात ठेवावे.

अभिप्राय द्या!