युनिट्स दुसऱ्याचे नावे कशी करावीत?
प्रथम युनिटधारकाचा मृत्यू झाल्यास ते युनिट दुसऱ्या युनिटधारकाच्या नावे करता येते. युनिटधारक एकच असेल तर, त्याच्या मृत्यूनंतर ते युनिट नामांकित व्यक्तीच्या (नॉमिनी) नावे करावे लागते. अशा वेळी दुसऱ्या युनिटधारकाला किंवा नामांकित व्यक्तीला या मृत्यूची माहिती म्युच्युअल फंडाला द्यावी लागते. त्यासोबत युनिटधारकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, केवायसी, एफएटीसीए तपशील तसेच बँक खातेक्रमांकही जोडावे लागते. काही फंडांना दुसऱ्या युनिटधारकाचे किंवा नामांकित (नॉमिनेटेड) व्यक्तीचे बँक तपशीलही लागतात.
युनिटधारक जिवंत असेल तर, म्युच्युअल फंड कोणतीही कागदपत्रे विचारणार नाही. परंतु नॉमिनीने या युनिटवर दावा केल्यास त्याला सर्व वैध कागदपत्रे द्यावी लागतील. या सर्व कागदपत्रांबरोबरच नॉमिनीला इन्डेम्निटी प्रमाणपत्रही द्यावे लागते. या प्रमाणपत्राचा नुमना प्रत्येक म्युच्युअल फंडात वेगवेगळा असतो.
सर्व कागदपत्रे योग्य असतील तर सर्व प्रक्रिया सुरळित पार पडते. सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर म्युच्युअ फंडाला सुनिटवरील नाव बदलण्यासाठी कामकाजाचे पाच ते १० दिवस लागतात.
डिमॅट स्वरूपात म्युच्युअल फंडाचे युनिट असतील तर काय करायचे?
अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या युनिट्सची खरेदी भांडवल बाजारातून करतात. संयुक्तरीत्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स घेतले असतील तर, एकाचा मृत्यू झाल्यास त्याची मालकी दुसऱ्याकडे आपोआप हस्तांतरित केली जाते. त्यासाठी मृत युनिटधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र व खाते बंद करण्याचा अर्ज द्यावा लागतो. ज्या खात्यात युनिट हस्तांतरित करायचे असतात त्याचा तपशील दुसऱ्या व्यक्तीच्या तपशीलांशी मिळताजुळता असणे गरजेचे आहे. असा तपशील उपलब्ध नसेल तर जिवंत नॉमिनीला किंवा वारसाला नवे डिपॉझिटरी खाते उघडावे लागते.