बॅंका सहसा फक्त सहा दिवसांपर्यंच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत, परंतु लिक्विड योजनांमध्ये तुम्ही पैसे एक दिवसासाठीसुद्धा ठेवू शकता.
तसेच ते एक दिवसाच्या “नोटिसी’मध्ये परत काढता येतात. पैसे थेट बॅंकेत जमा होतात. त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रोज मोजले जाते, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा. त्यामुळे बहुतेक मोठ्या कंपन्या या योजनांमध्ये शुक्रवारी पैसे ठेवतात व सोमवारी काढून घेतात. कारण शनिवार व रविवार आर्थिक व्यवहार बंद असतात.
सध्या या योजनांवर साधारणपणे 7 टक्के व्याज मिळते, जे स्थिर नसून बदलते असते. परंतु योजनांमधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही. तो फक्त “डेट’ अर्थात रोखे विभागामध्ये गुंतविला जातो, जो तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित असतो. यात मोबाईल आणि ऑनलाइन व्यवहार करता येतात. अशा योजनांत किमान 10 हजार रुपये गुंतविता येतात आणि त्याला कमाल मर्यादा नाही. काही कारणांनी बॅंकेमध्ये जास्त पैसे जमा होत असतात, जसे की मुदत ठेव किंवा विम्याचे पैसे, निवृत्त झाल्यावर “पीएफ’ आणि “ग्रॅच्युइटी’चे पैसे, जमीन अथवा घर विकून आलेले पैसे. या पैशांच्या गुंतवणुकीच्या पुढील योजना ठरेपर्यंत 2 ते 6 महिने हे पैसे बॅंकेत पडून असतात. छोटा-मोठा व्यवसाय असेल तर वारंवार याची पुनरावृत्ती होते, जसे की कामगारांचे पगार, कच्चा माल आणण्यासाठी केलेली तजवीज. यामध्ये लगेच हे पैसे खर्च होत नाहीत.
अशा वेळी जर हे पैसे तत्काळ लिक्विड योजनांमध्ये ठेवले तर त्यावर जास्त परतावा मिळविता येऊ शकतो. एक कोटी रुपये जर फक्त प्रत्येक शनिवार व रविवार अशा दोन दिवसांसाठी जरी गुंतविले तरी वर्षाला साधारणपणे एक लाख रुपये मिळतात, जे बॅंकेमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहेत.