ज्या करदात्याचा उद्गम कर (टीडीएस) वजा जाता वार्षिक उत्पन्नांतून देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशा पगारदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून चार हप्त्यात अग्रिम कर भरावयाचा आहे. तो किती आणि केव्हा भरावा लागतो ते खालील तक्त्यात दर्शविले आहे :

कधी भरावा किती भरावा

१५ जूनपूर्वी १५.००%

१५ सप्टेंबरपूर्वी ४५.००%

१५ डिसेंबरपूर्वी ७५.००%

१५ मार्चपूर्वी १००.००%

वरील शेकडा प्रमाण हे अंदाजित देय कराचे आहे. उदा. अंदाजित देय कर (उद्गम कर वजा जाता) २०,००० रुपये इतके असेल, तर २०,००० रुपयांच्या १५ टक्के म्हणजेच ३,००० रुपये १५ जूनला किंवा त्यापूर्वी भरावा लागेल, दुसरा हप्ता एकूण ४५ टक्के (९,००० रुपये) इतका कर भरला गेला पाहिजे, म्हणजेच दुसरा हप्ता १५ सप्टेंबरपूर्वी ६,००० रुपयांचा भरावा लागेल. तिसरा हप्ता ७५ टक्के (१५,००० रुपये) भरला गेला असला पाहिजे, म्हणजेच तिसरा हप्ता १५ डिसेंबर रोजी किंवा त्या पूर्वी ६,००० रुपयांचा भरावा लागेल. शेवटचा हप्ता १०० टक्के (२०,००० रुपये) भरला गेला असला पाहिजे, म्हणजेच तिसरा हप्ता १५ मार्चपूर्वी ५,००० रुपयांचा भरावा लागेल. असा एकूण देय कर ३१ मार्चपूर्वी अग्रिम कर म्हणून भरावा लागतो. हा वेळेवर भरल्यास व्याज वाचू शकते.

अभिप्राय द्या!