२०१७ या वर्षांत काही उल्लेखनीय सुधारणा शेअर बाजारात घडल्या. देशातील डिमॅट खात्यांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा ओलांडला, तर म्युच्युअल फंड युनिटधारकांच्या संख्येने ५.५ कोटी फोलिओचा आकडा पार केला. म्युच्युअल फंडातील वार्षिक गुंतवणुकीने वीस हजार कोटींचा टप्पा ओलांडला तर ‘सिप’ (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)मधील गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्युच्युअल फंड सिपधारकांची फोलिओ संख्या आता १.८० कोटीवर पोहोचली आहे. किरकोळ गुंतवणूकदार बँकेतील मुदत ठेवी आणि सोने किंवा जमीन यांच्यातील गुंतवणूक कमी करून, शेअर बाजारात नवीन कंपनीच्या भागभांडवलाद्वारे (आयपीओ) येत असून, तरुण पिढी सिपच्या माध्यमातून गुंतवणूक करून बाजाराकडे वळत आहे.
सध्या शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स हे डिमॅट खात्यात एकत्र दिसू शकतात. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांच्या बँकेमधील मुदत ठेवी, पोष्टामधील गुंतवणुका, विमा पॉलिसी, नॅशनल पेन्शन स्कीममधील ठेवी असे सर्व जर एका खात्यात दिसू लागले तर त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांसाठी असलेली नियामक मंडळे एकत्र येऊन डिमॅटच्या स्वरूपात ही माहिती देण्यासाठी जेव्हा आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देईल तेव्हा हे शक्य होईल. गुंतवणूकदारांना आपली स्वत:ची गुंतवणूक बघण्यासाठी विविध संकेतस्थळांवर जाऊन वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवून बघण्याची गरज उरणार नाही. आधार कार्डाची माहिती वापरून डिमॅट तसेच ट्रेडिंग खाते उघडण्याची वेळ आता १५ ते २० मिनिटांवर आली आहे.
या सर्वं सुधारणांचे फायदे थोडक्यात खालीलप्रमाणे आहेत .
- खर्चातील बचत : गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अनेक खाती उघडण्याची गरज राहणार नाही. यामुळे एएमसी (वार्षिक खाते चालू ठेवायचे मूल्य) यात बचत होईल.
- एकच ‘केवायसी’ केल्याने सध्या फक्त भांडवली बाजारातील गुंतवणुकीबरोबर इतर गुंतवणुकीसाठी पुन्हा पुन्हा ओळखपत्र देण्याची जरूर राहणार नाही. यामुळे एखाद्याने जागा बदलली तर त्याला फक्त एकाच ठिकाणी नवीन जागेची माहिती दिल्यास आपल्या खात्यात पत्ता बदल करून घेता येईल.
- मृत्युपश्चात संपत्तीची वाटणी तसेच होणाऱ्या दाव्यांची पूर्तता : गुंतवणूकदाराच्या मृत्युपश्चात त्याच्या विविध ठिकाणी असलेली गुंतवणुकीची माहिती त्याच्या वारसदारांना समजून ती हस्तांतरित करणे सुलभ होईल. जर अशा सर्व गुंतवणुका एकाच डिमॅट खात्यात असतील, तर सध्या विनादावा ज्या गुंतवणुका पडून राहतात त्यांचे प्रमाण खूपच कमी होईल.
- डिमॅट सेवा पुरवणाऱ्या ३०,०००हून अधिक ठिकाणी, सर्व गुंतवणूक साधनांची माहिती देणे सोपे होईल तसेच नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) सारख्या योजना आम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी डीपींचे विस्तृत जाळे उपयोगी पडू शकेल.
- सर्व गुंतवणुका डिजिटल स्वरूपात आल्याने कागदविरहित वातावरण असेल. त्या अर्थी कागद स्वरूपात गुंतवणुकांचे धोके -जळणे, फाटणे, चोरी होणे इ. टळतील.
- बँक मुदत ठेवींवर फक्त स्वत:च्या बँकेतून कर्ज मिळण्याची सोय आहे, वरील सामाईक सुविधेतून इतर बँकांमधूनही कर्ज मिळू शकेल.
- आज सावंतवाडी सारख्या ठिकाणी आंबोली गावातील १२ व्यापारी मंडळींची demat खाती असणे हे ह्या सर्व सुधारणांचे फळ आहे असेच माझे मत आहे
- आणि या दृष्टीने शेअर बाजाराला निश्चितच अच्छे दिन येताहेत असे आपण समजूया !!.