नव्या वर्षाची सुरवात ही नवा संकल्प घेऊन होत असते, त्यामुळे आपणही या वर्षी शेअर बाजाराकडे लक्ष देण्याचा संकल्प करण्यास हरकत नाही. सरलेल्या वर्षात शेअर बाजाराची झालेली वाढ पाहून अनेकांना असे वाटू शकते, की शेअर बाजार आता वाढला असून, आपण संधी गमावली किंवा खूप उशीर झाला; परंतु तसे नसून, शेअर बाजारात संधी कायम असते, ती ओळखून त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे असते. फक्त हे करताना जोखीम आणि परतावा यांची योग्य सांगड घालणे गरजेचे असते.

बॅंका, तसेच टपाल खात्यातील ठेव योजनांचे व्याजदर घसरत चालले आहेत. दुसरीकडे सोन्याच्या भावातही घसरण होत आहे, रिअल इस्टेट क्षेत्रही थंडावले आहे. अशा वेळी शेअर बाजार म्हणजेच “इक्विटी’ या “ऍसेट क्‍लास’ला “अच्छे दिन’ येत असल्याचे चित्र दिसत आहे. पुढील पाच-सात वर्षे हा इक्विटी हाच ऍसेट क्‍लास चांगला परतावा मिळवून देईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व संस्थांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या शेअर बाजाराच्या निव्वळ बातम्या वाचून स्वप्नरंजन करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ आहे. ज्याप्रमाणे काठावर बसून पोहता येत नाही; तसेच केवळ विचार करून चांगला परतावा मिळत नाही. त्याला कृतीची भक्कम जोड द्यावीच लागते. म्हणजेच तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने प्रत्यक्ष गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा लागतो. ज्यांना थेट शेअरखरेदीत जोखीम वाटते, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडाचा मार्ग उपलब्ध असतोच. अप्रत्यक्षपणे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचाच हा मार्ग आहे. बॅंक ठेवी, सोने, रिअल इस्टेट हे पर्याय अनुभवल्यानंतर आणि तेथील परतावा पाहिल्यानंतर दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून शेअर बाजाराचा विचार 2018 या नववर्षात नक्की करावा.

कारण हे वर्ष गुंतवणुकीचा राजयोग घेऊन येत आहे, असे आम्हाला वाटते.

अभिप्राय द्या!