शुद्ध विमा पॉलिसीतच सुज्ञता!
पूर्वी अर्ध-अर्थसाक्षरतेमुळे करदाते विमा कंपन्यांची उत्पादने मुख्यत्वे विम्यापेक्षा करवजावटीसाठी विकत घेत असत. मनीबॅक प्रकारच्या पॉलिसींच्या परताव्याचा दर ४-४.५० टक्के तर एंडोमेंट प्रकारच्या पॉलिसींच्या परताव्याचा दर ५ ते ६ टक्क्य़ांच्या दरम्यान असतो. मुदतीनंतर मिळणारे पैसे हे करमुक्त असल्याचे समाधान गुंतवणूकदारांना मिळते. विमा व्यवसायातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असल्याने मुद्दलाच्या सुरक्षिततेचे समाधान वेगळे. विमा उत्पादने अल्प परतावा देणारी आणि १५ ते २० वर्षे कालावधीसाठी म्हणजेच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी असतात. एखाद्या वर्षी नोकरी सुटल्यामुळे किंवा व्यवसायात तोटा झाल्याने करपात्र उत्पन्न नसूनदेखील विमा पॉलिसी सुरू राहण्यासाठी ठरलेला हप्ता भरणे आवश्यक असते. विमा पॉलिसीचा कालावधी जितका कमी तितका परतावा कमी. विमा उत्पादनात लवचीकता नसते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी घेतलेली पॉलिसी १५ वर्षे मुदतीची असल्याने साठाव्या वर्षी निवृत्तीनंतर आणखी पाच वर्षे विमा पॉलिसीचा हप्ता भरावा लागतो. विमा आणि गुंतवणूक एकत्र असलेल्या (मनीबॅक आणि एंडोमेंट) पॉलिसीच्या हप्त्यांपैकी मध्ये काही रक्कम जीवन विम्याच्या हप्त्यासाठी तर उर्वरित रक्कम गुंतवणुकीसाठी वापरली जाते. वाढत्या वयानुसार विम्याचा हप्ता वाढत जातो. मनीबॅक आणि एंडोमेंट पॉलिसीमार्फत मिळणारे विमा छत्र अपुरे असल्याने वयाची ३० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी घेतलेली शुद्ध विमा पॉलिसी हा आर्थिक सुज्ञपणा ठरतो.