ईएलएसएसचे फायदे

अर्थनिरक्षरतेमुळे ईएलएसएस हा प्रकार आजपर्यंत जरी दुर्लक्षिला गेला असला तरी यापुढे ईएलएसएसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वाधिक परतावा देणारा हा गुंतवणूक प्रकार आहे. गुंतविलेली सर्व रक्कम कोणतेही शुल्क न वगळता, सर्व रक्कम फंडात गुंतविली जाते. ही गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या मर्जीनुसार करायची असल्याने, ज्या वर्षी करपात्र उत्पन्न नाही किंवा घर खरेदी किंवा मुलांचे शिक्षण सुरू झाल्यानंतर गुंतवणूक रक्कम कमी करण्याची सोय ईएलएसएस फंडात आहे. समभाग गुंतवणूक हा प्रकार स्थावर मालमत्ता, मौल्यवान धातू, मुदत ठेवी, विमा उत्पादने यापेक्षा अधिक परतावा देणारा आहे. ईएलएसएस  हा समभाग गुंतवणूक असलेला फंड प्रकार असून तीन वर्षांसाठी गुंतवणूक असल्याने अन्य फंड प्रकारांच्या तुलनेत यात सर्वाधिक समभाग गुंतवणूक असते. साहजिकच निधी व्यवस्थापक कमी रोकड सुलभता राखत असल्याने या फंड प्रकारांनी मागील पाच वर्षांत सरासरी २२ टक्के परतावा दिला आहे.

नोकरी पेशातील चाकरमान्यांचा वेतनातून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) कापला जातो. कलम ८० सी नुसार जास्तीत जास्त १.५० लाखांपर्यंत करवजावटीसाठी गुंतवणूक करता येते. या १.५० लाखांमधून भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणूक, मुदतीचा विमा शिकत असलेल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क वगळता उर्वरित सर्व रक्कम ईएलएसएस फंडात गुंतविणे हिताचे आहे. ईएलएसएस गुंतवणूक ही ‘एक्झेम्प्ट-एक्झेम्प्ट-एक्झेम्प्ट’ अर्थात ‘ईईई’ प्रकारची आहे. म्हणजे गुंतविलेल्या रकमेवर करवजावट मिळते. तीन वर्षांनतर मिळणारी भांडवली वृद्धी आणि मूळ गुंतवणूकही करमुक्त आहे. या फंडांचा निधी व्यवस्थापक आपले कौशल्य वापरून समभागांची निवड करीत असल्याने कमीतकमी ईएलएसएस फंडातील १००० रुपयांच्या ‘एसआयपी’मध्ये किंवा ५००० रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीतून समभाग गुंतवणुकीत वैविध्य मिळविता येते. फंड व्यवस्थापकाच्या अनुभवाचा फायदा आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा लाभ ईएलएसएस फंडातील गुंतवणुकीत मिळविता येतो. गुंतवणूक करणे जितके सहज असते पैसे काढून घेणे तितकेच सुलभ असून एक ‘रिडम्शन रिक्वेस्ट’ भरून फंड घराण्याकडे दिल्यावर कामकाजाच्या चौथ्या दिवशी (टी प्लस टू) खात्यात रक्कम जमा होते. एखाद्या व्यक्तीने दरमहा ८,७५० रुपयांची एसआयपी कमावत्या ३५ वर्षांमध्ये केल्यास ३६.७५ लाखाच्या गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा दराने ५.६८ कोटीचा निवृत्ती कोश जमविणे शक्य आहे. फक्त चिकाटीने ३५ वर्षे एसआयपी करीत राहणे गरजेचे आहे.

अभिप्राय द्या!