आवाक्यात आलेले दर आणि अधिक उपयोगिता यांमुळे हल्ली स्मार्टफोन वापराचा ट्रेंड झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. मोबाइलच्या माध्यमातून शॉपिंग, बँकिंग, तिकिटे बुक करण्याकडे यूजरचा कल वाढत आहे. एकीकडे स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी, ते वापरण्यातील धोके आणि मर्यादा यांचा विचार न करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मोबाइल बँकिंग करण्यामुळे घरबसल्या आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले असले तरी, पुरेशी काळजी न घेतल्यास फसवणूक अथवा दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मोबाइल बँकिंग करताना घ्यावयाच्या दक्षतेचा घेतलेला आढावा…

सुरक्षिततेच्या सवयी लावून घ्या

कोणतेही उपकरण वापरताना मग तो मोबाइल का असेना, पुरेशी काळजी घेतली तर अनेक संकटे टाळता येऊ शकतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेची कोणत्याही प्रकारची माहिती मोबाइलवर साठवून ठेवू नका. अकाउंट क्रमांक, डेबिट अथवा क्रेडिट कार्डचे पिन नंबर, नेटबँकिंगचे पासवर्ड आदी गोपनीय माहिती शक्यतो सेव्ह करणे टाळावे. जर तुम्ही बँकिंग अॅपच्या माध्यमातून व्यवहार करीत असाल, तर यूजरनेम आणि पासवर्ड हँडसेटवर सेव्ह न करण्याची दक्षता घ्या. चुकून अशी दक्षता न घेतल्यास मोबाइल चुकीच्या हाती पडल्यास मोठा भूर्दंड बसण्याची शक्यता अधिक असते. सार्वजनिक ठिकाणी अथवा वायफाय हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी मोबाइल बँकिंगचा वापर करणे टाळा. मोबाइल बँकिंगचा वापर करताना मोबाइल सेवा पुरवठादाराने दिलेले नेटवर्क अथवा पासवर्डने सुरक्षित असणाऱ्या वायफाय कनेक्शनचा वापर करा. या शिवाय तुमच्या बँक अकाउंटची माहिती कोणालाही एसएमएसद्वारे पाठवू नका. या शिवाय मोबाइल वापरताना शक्यतो स्क्रीन अनलॉकच्या सेवेचा अवश्य वापर करा.

अभिप्राय द्या!