बाजारातून खरेदी केलेली वस्तू अथवा सेवेबद्दल तुम्ही ग्राहक म्हणून फारसे समाधानी नसाल, आपण फसवले गेलो आहोत अशी तुमची भावना असेल, खरेदी वस्तू अथवा सेवेच्या दर्जावर नाखूश असाल तर खालील पर्यायांचा अवलंब करून दाद मागितली जाऊ शकते.

वस्तू अथवा सेवा

वस्तूची निर्मिती करणाऱ्या अथवा सेवा पुरवठाधारकाच्या कस्टमर केअरशी त्वरित संपर्क साधा. वस्तूच्या वेष्टनावर अथवा देयकावर टोल फ्री क्रमांक नमूद करण्यात येतो. तेथे संपर्क साधून वस्तू अथवा सेवेविषयी तक्रार नोंदविता येते. तक्रारीचा क्रमांक रितसर लिहून ठेवा.

कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित कंपनीच्या उच्चाधिकाऱ्याशी बोलणी करता येऊ शकेल. अशावेळी त्यांच्याशी केलेल्या संवादाचे सर्व तपशील आणि वेळा टिपून ठेवा. शक्यतो कंपनीला एखादा ई-मेल करावा. जेणेकरून लिखित पुरावा आपल्यापाशी राहील.

नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइनशी (१८००-११-४०००) या टोल फ्री क्रमांकावर किंवा कोअर (www.core.nic.in) या वेबसाइटवर संपर्क साधा. संबंधित कंपनीने त्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास लोकायुक्त अथवा ऑम्ब्युड्समनशी संपर्क साधावा.

या प्रक्रियेतील शेवटची आणि अंतिम पायरी म्हणजे ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करणे. संबंधित वस्तू अथवा सेवेमध्ये दोष आढळल्यापासून दोन वर्षांच्या आत तक्रार दाखल करता येते. न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर तिची नोंदणी होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो.

रिअल इस्टेट

रिअल इस्टेट क्षेत्रातील नियामकाच्या अभावी प्रत्येक ग्राहकावर ही जबाबदारी येते. सर्वप्रथम संबंधित बांधकाम व्यवसायिकाकडे तक्रार करावी.

बांधकाम व्यावसायिकांनी दाद न दिल्यास संबंधित शहरातील क्रेडाई, एनएआरईडीसीओ आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रिअॅल्टर्सशी संपर्क साधावा.

शेवटचा पर्याय म्हणजे दिवाणी अथवा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करणे.

बांधकामाच्या ठिकाणी असणारे सॅम्पल फ्लॅट आणि प्रत्यक्षातील फ्लॅट यात फरक असू शकतो. काही कालावधीनंतर सॅम्पल फ्लॅट नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकास तक्रारीस जागा उरत नाही.
फ्लॅटचे बुकिंग रद्द करताना बिल्डर कोणतेही निकष पाळत नाहीत. त्यामुळे बुकिंगची रक्कम रोख देणे टाळावे. तसेच त्या रकमेची पावती अवश्य मागून घ्यावी.

प्रकल्प बारगळल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सातत्याने बिल्डरशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

अभिप्राय द्या!