रोबो अॅडव्हायझर म्हणजे काय ?
तर वित्तीय सल्ला देणारे माणसानेच बनविलेले एक मशीन. कमीत कमी मनुष्य हस्तक्षेपाशिवाय ते ऑनलाइन व्यासपीठावर सेवा पुरवतात. गुंतवणूक सल्लागाराचे काम हे आपल्या गुंतवणूकदाराची खरी गरज ओळखून निष्पक्ष सल्ला देणे हे आहे. रोबो अॅडव्हायझरीमध्ये कुठल्याही सल्लागाराचा थेट सहभाग नसल्यामुळे गुंतवणूकदाराला काहीशा कमी खर्चात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. त्यामुळे वरकरणी हे बरोबर आहे की गुंतवणूकदाराला यामुळे थेट गुंतवणुकीचा फायदा मिळतो. पण खोलात जाऊन याचे विश्लेषण केल्यास याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
आपण आधी रोबो अॅडव्हायझर आणि गुंतवणूक सल्लागार यामध्ये फरक करणारी वैशिष्टय़े बघूया. रोबो अॅडव्हायझर हे आधुनिक आणि ज्याप्रमाणे त्यांना माहिती पुरविली जाते त्याप्रमाणेच प्रमाणित सल्ला देतात, तर गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदाराच्या त्याच्या वैयक्तिक गरजा समजून सानुकूलित सल्ला देऊ शकतात. रोबो अॅडव्हायझरीमध्ये मानवी संपर्क फारच कमी असतो. किंबहुना तो नसतोच. परंतु गुंतवणूक सल्लागाराला आपण प्रत्यक्ष समोरासमोर भेटून गुंतवणुकीबाबत चर्चा करू शकतो.
कमीत कमी खर्चात रोबो अॅडव्हायझर सेवा पुरवते आणि गुंतवणूक सल्लागारचा सक्रिय सहभाग असल्यामुळे गुंतवणुकीवर होणारा खर्च हा काहीसा अधिक असतो. रोबो अॅडव्हायझरीमध्ये गुंतवणुकीचे पर्याय हे मर्यादित असतात. परंतु गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतल्यास तो विविध पर्याय सुचवू शकतो.
रोबो सल्लागार तुम्हाला वरवरची माहिती देतो, पण गुंतवणूक सल्लागार सखोल माहिती देतो. जर तुम्हाला तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी गुंतवणूक करायची असेल तर रोबो अॅडव्हायझर तुम्हाला एक त्याची ढोबळ योजना तयार करून देईल आणि गुंतवणूक सल्लागार निवृत्ती नियोजनाबरोबरच तुमच्या उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ, कराचे नियोजन अशा अनेक संलग्न परंतु महत्त्वाच्या बाबींचा सल्ला देईल.
म्हणून मानवी सल्लागाराच गुंतवणुकीसाठी महत्वाचा !!