ईएलएसएसमधील गुंतवणूक काढू का?
दीर्घकालीन भांडवली लाभावर (एलटीसीजी) कर आकारण्यात येणार असल्यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) व युलिप हे करबचत करणारे पर्याय आता ईएलएसएसच्या तुलनेत अधिक कर वाचवणारे (करानुकूल) ठरणार आहेत. ईएलएसएस फंडांतील गुंतवणुकीवर १० टक्के कर लागणार आहे. परंतु त्यामुळे ईएलएसएसमधून लांब पळणे श्रेयस्कर नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक योजनेतील गुंतवणुकीला वेगवेगळे स्थान आहे. इक्विटी आधारित असल्यामुळे ईएलएसएसमध्ये गुंतवणूकदाराला अधिक प्रमाणात उत्पन्न देण्याची क्षमता आहे. त्यामुळे या प्रकारच्या फंडातील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श मानली जाते. बिनधास्त दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना ईएलएसएसचे अजूनही आकर्षण असते. याचे कारण एलटीसीजीनंतरही पीपीएफ व महागड्या युलिपपेक्षा ईएलएसएसमधून अधिक उत्पन्न मिळते.
विमा कंपन्यांकडून थेट विकल्या जाणाऱ्या युलिप योजनांतून मिळाणाऱ्या उत्पन्नाची तुलना कदाचित ईएलएसएसमधून मिळणाऱ्या दीर्घकालीन उत्पन्नाशी होऊ शकेल. युलिपपेक्षा ईएलएसएस योजना अधिक लवचिक ठरते. ईएलएसएसमधील गुंतवणूक त्याच फंडात अनेक वर्षे ठेवावी असा काही नियम नसतो. अशा फंडाची कामगिरी समाधानकारक होत नसेल तर त्या योजनेतून पैसा अन्यत्र वळवता येतो. त्याचवेळी युलिपच्या बाबतीत गुंतवणूकदाराला केवळ दुसऱ्या युलिपमध्येच पैसा वळवता येतो. त्यामुळे एलटीसीजी लागू झाल्यानंतर ईएलएसएसचे आकर्षण काही अंशी कमी झाले असले तरीही प्राप्तिकर कलम ८०सी अंतर्गत ईएलएसएस हाच उत्तम पर्याय दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी आहे. ईएलएसएसला सर्वात कमी, म्हणजे तीनच वर्षांचा लॉकइन कालावधी आहे.
अर्थसंकल्पात एलटीसीजीची घोषणा झाल्यानंतर युलिप योजना विकणाऱ्या विमा कंपन्यांनी विमा पॉलिसी आणि युलिप यांवर करमुक्त उत्पन्न मिळेल, अशा जाहिराती प्रसिद्ध करणे सुरू केले. मात्र अशा योजनांपासून लांब राहणेच अधिक चांगले. करमुक्त विमा पॉलिसींपेक्षा म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे अधिक श्रेयस्कर ठरते. कोणत्याही स्थितीत विमा व गुंतवणूक हे एकत्र करता उपयोगी नसते. जिविताचे संरक्षणच करायचे असेल तर त्यासाठी टर्म विमा हा उत्तम पर्याय ठरतो.
तुम्हाला प्राप्तिकर कायदा कलम ८०सी अंतर्गत करबचत करायची असेल तर ईएलएसएस गुंतवणूक हा उत्तम पर्याय ठरू शकेल. यामध्ये ईएलएसएस अधिक उत्पन्न देईल, तर पीपीएफ स्थिर व निश्चित उत्पन्न देईल. त्यामुळे गुंतवणूकदाराकडे दोन्ही प्रकारची गुंतवणूक असणे हिताचे आहे.