म्युच्युअल फंडाकडून प्रत्येक योजनेची फॅक्टशीट दर महिन्याला प्रसिद्ध केली जाते. त्यावरून तुम्ही तुमच्या योजनेचा तपशील पाहू शकता. ही फॅक्टशीट म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर सहजगत्या उपलब्ध असते. यामध्ये प्रत्येक योजनेचा तपशील, योजनेतील पैसा गुंतवला जात असलेला पोर्टफोलिओ, समभाग यांची माहिती दिलेली असते. यामुळे बेंचमार्कच्या तुलनेत या योजनेची वाटचाल कशी होते आहे, वार्षिक परतावा किती मिळतो आहे आणि स्टँडर्ड डिव्हिएशन, बिटा व शार्पी हे रेशो यांच्याही माहिती मिळते.

कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेची वाटचाल ही केवळ त्याच योजनेचा इतिहास पाहून ठरवता येत नाही. ही वाटचाल मोजताना तिची तुलना अन्य म्युच्युअल फंडांमध्ये असलेल्या तशाच प्रकारच्या अन्य योजनांबरोबर करणे गरजेचे आहे. प्रत्येक फंडाच्या फॅर्टशीटशिवाय म्युच्युअल फंडांची वाटचाल अभ्यासणाऱ्या काही स्वतंत्र वेबसाइट्सदेखील आहेत. या वेबसाइट्सवरूनही तुम्ही तुमच्या योजनेचा आढावा घेऊ शकता. हा आढावा तिमाही, सहामाही किंवा वार्षिक घेता येऊ शकतो.

माध्यमांमध्ये संबंधित योजनेविषयी कोणते वृत्त येते त्याकडे लक्ष द्यावे. फंड व्यवस्थापनात बदल झाल्यास संबंधित योजनेकडून होणाऱ्या गुंतवणुकीचे निकष बदलू शकतात. समजा असा बदल झाला तर, नव्या फंड व्यवस्थापकाचा तपशील पहावा, पोर्टफोलिओ पहावेत. नव्या फंड व्यवस्थापकाने गुंतवणुकीचा पॅटर्न बदलल्यास त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीत आणि तो फंड लार्ज कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणारा असेल, तर त्यामध्ये लार्ज कॅप गटातील ७५ टक्के कंपन्या असणे गरजेचे आहे. परंतु फंड व्यवस्थापकाने तुमच्या पोर्टफोलिओचा पॅटर्न बदलला व त्यामुळे यात आता ३० ते ४० टक्के मिड कॅप कंपन्यांत गुंतवणूक होऊ लागली तर त्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते.

अभिप्राय द्या!