उद्दिष्टे निश्चित करा

आर्थिक नियोजनाचा विचार करताना अल्पकालीन असो वा दीर्घकालीन असो सर्वप्रथम उद्दिष्टांची निश्चिती आवश्यक आहे. बऱ्याचदा क्षुल्लक गोष्टींसाठी आर्थिक तजवीज करण्याचा घाट घातला जातो. ती गोष्ट प्राप्त झाली की, नियोजनाचा बोजवारा उडतो. म्हणूनच आर्थिक नियोजन ही खूप विचाराअंती आणि दीर्घ काळासाठी करण्याची गरज आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता निवृत्तिनंतरची तरतूद म्हणून दोन कोटी रुपयांचा निधी जास्त वाटतो. परंतु, वीस वर्षांनंतर येणाऱ्या परिस्थितीचा विचार करता ही रक्कम खूपच अपुरी पडत असल्याचे लक्षात येईल. आर्थिक नियोजन ही सहज सुचली म्हणून आणि अंदाजांवर आधारित करण्याची गोष्ट नाही. आर्थिक गणितांचा हिशेब मांडून आणि उद्दिष्टांची दिशा निश्चित करूनच आर्थिक नियोजन करण्याचा विचार करावा. मोठी उद्दिष्टे गाठण्यासाठी लहानसहान उद्दिष्टांपासून सुरुवात करणे कधीही उत्तम. उदाहरणार्थ..दरमहिना तीस हजार रुपयांची बचत केल्यास तीन वर्षांनी दहा लाख रुपये घराचे डाउन पेमेंट म्हणूनही वापरता येऊ शकतात.

छोटी सुरुवात करा

अनेकांच्या वैय​क्तिक अनुभवांअंती असे दिसून आले आहे, की एकरकमी आणि मोठ्या प्रमाणावर बचत करणे अवघड गोष्ट आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे अल्प प्रमाणात बचतीला सुरुवात केल्यास भविष्यात मोठी गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. सध्याची गरज कमी असल्याने बचतीला प्रचंड वाव असतो. या परिस्थितीचा फायदा करून घेत दरमहिना थोडी का होईना बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात अचानक आर्थिक अडचण निर्माण झाल्यास थोडासा का होईना हातभार लागू शकतो. जसजशी उत्पन्नात वाढ होईल, तसतशी बचतीची रक्कम वाढविण्याचा सल्ला .

चलनवाढीला दुर्लक्षित करू नका

सातत्याने फुगणाऱ्या चलनवाढीबद्दल सामान्य लोक चवीचवीने चर्चा करताना दिसतात. मात्र, या चलनवाढीचा दीर्घकालीन उद्दिष्टांवर होणाऱ्या परिणामांबाबत कुणीही ब्र काढताना दिसून येत नाही. चलनवाढीच्या दरात अल्पशी जरी वाढ झाली तरी त्याचा परिणाम भविष्यातील बचतीवर होतो. उदाहरणार्थ..तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आजच्या घडीला १५ लाख रुपये खर्च येईल असे गृहीत धरूया. चलवाढीचा दर ८ टक्के धरल्यास, दहा वर्षांनी हाच खर्च ३२ लाखांच्या घरात पोहोचला असेल. त्यामुळे चलनवाढीचा विचार करताना भविष्यातील तरतूद कशी वाढेल हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्याच्या काळात गुंतवणूक अथवा बचत करताना चलनवाढीचा धोका लक्षात घेणे आवश्यकच ठरते.

गुंतवणुकीला कालावधीशी जोडून घ्या  

प्रत्येक उद्दिष्टपूर्तीसाठीचा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक उद्दिष्ट साधण्यासाठी ठरावीक वेळ आणि बचत करणे क्रमप्राप्त ठरते. मुलांच्या शिक्षणासाठी ठरावीक रक्कम जमविण्यासाठी तीन वर्षांहून कमी कालावधी हातात असेल, तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी डेटमध्ये करणे कधीही श्रेयस्कर. त्यामुळे तुमच्या भांडवलाची सुरक्षितताही जपता येईल. डेटमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर साधारणतः ८ ते ९ टक्के दराने व्याजही मिळेल, मूळ गुंतवणूक सुरक्षितही राहील आणि गरजेच्या वेळी ठरावीक रक्कम हातीही येईल. जर तुम्ही भविष्याची तरतूद म्हणून २० ते २५ वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल, तर इक्विटीवर आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन आणि अधिक दराने परतावा मिळण्याची शक्यता असते.

अभिप्राय द्या!