अनेकजण आर्थिक वर्ष संपत असताना करबचत करणाऱ्या गुंतवणुकांचा विचार करतात. मग ते गुंतवणूकदार हमखास विम्याची पारंपरिक पॉलिसी घेतात किंवा युलिप पॉलिसीत पैसे गुंतवतात. त्याऐवजी करबचत करण्याकडे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लक्ष दिल्यास त्याचा वर्षअखेर फायदा होतो. अशी गुंतवणूक करताना प्राप्तिकर कलम ८०सी मधील तरतुदींचा विचार करा. त्यानंतर म्युच्युअल फंडांतील एसआयपींचा विचार करा. तुम्हाला डेट योजनांतून पैसा गुंतवणे योग्य वाटत असेल तर तो एकगठ्ठा गुंतवावा असा सल्ला बरेच वित्त नियोजक देतात. पीपीएफसारख्या योजनांतून आर्थिक वर्ष सुरू होताच ५ एप्रिलपर्यंत गुंतवणूक करावी, जेणेकरून चक्रवाढ व्याजपद्धतीचा आपल्याला लाभ मिळत राहतो. तसेच प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पीपीएफमध्ये पैसे टाकल्यास त्या संपूर्ण महिन्याचे व्याजही मिळते.

ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधीचा विचार करा

व्याजदरात कपात झालेली असली तरीही कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीने (ईपीएफ) सर्वाधिक व्याज दिलेले आहे. ईपीएफ व पीपीएफ यांच्या उत्पन्नात मोठी तफावत आहे. डेट योजनांमध्ये ईपीएफ कायमच चांगले उत्पन्न देत राहील, असे जाणकारांचे मत आहे. ईपीएफमध्ये अधिक पैसा गुंतवायचा असेल तर तो ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधीमार्फत (व्हीपीएफ) गुंतवता येतो. अनेक कंपन्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काही दिवस व्हीपीएफची सुविधा देऊ करतात. त्यामुळे आर्थिक वर्ष सुरू झाल्याबरोबर तुमच्या मनुष्यस्रोत विबागाकडे व्हीपीएफविषयी चौकशी करावी.

वार्षिक बोनसची गुंतवणूक करा

अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दरवर्षी बोनस म्हणून काही रक्कम दिली जाते. एकदा बोनस हाती पडल्यावर आपण मोठमोठे खर्च उरकून टाकतो. तुम्ही हा बोनस मिळवण्यासाठी वर्षभर मेहनत केलेली असते. त्यामुळे बोनस हे तुमचे अतिरिक्त वेतनच असते. त्यामुळे त्याचा विनियोग काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. बोनसची गुंतवणूक नेमकी कशी करावी याचा काही निश्चित फॉर्म्युला नाही. परंतु काही स्टँडर्ड नियम निश्चित आहेत. तुमच्या डोक्यावर बरेच कर्ज असेल, क्रेडिट कार्डचे मोठे बिल असेल तर, बोनसच्या रकमेतून त्याची भरपाई आधी करावी. त्यानंतर उरलेल्या बोनसमधून खर्च व गुंतवणूक करम्यासाठी रक्कम बाजूला काढावी. समजा तुम्हाला असा बोनस भावी काळात मिळणार नसेल तर मात्र बोनसची अधिकाधिक रक्कम गुंतवली कशी जाईल हे पाहावे.

शेवटच्या क्षणी प्राप्तिकर वाचवण्याच्या किंवा कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर आताच सावध व्हा. आर्थिक वर्ष संपायला अद्याप पंधरवडा बाकी आहे. त्यामुळे काही गोष्टी तातडीने करा, जेणेकरून तुम्हाला यावर्षीचा प्राप्तिकर भरताना तसेच पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करताना सोपे जाईल…

नियोजन व बचत या बाबी सुरुवातीपासूनच करणे हिताचे आहे !!

 

अभिप्राय द्या!