एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाची पहिली एनएएव्ही २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रोजी जाहीर झाली. या दिवसापासून फंडात ५,००० रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या १.८० लाख रुपयांचे ८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार वार्षिक २०.०६ टक्के दराने २.४१ लाख रुपये झाले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत वाहननिर्मिती पूरक उद्योग, रसायने, आरोग्य निगा, रोकडसंलग्न गुंतवणुका, खासगी बँका ही आघाडीची पाच गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे असून, आयसीआयसीआय बँक, मदरसन सुमी, टाटा केमिकल्स, रॅम्को सिमेंट आणि ऑरबिंदो फार्मा या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत सर्वसाधारणपणे ४५ ते ४७ कंपन्यांचा समावेश असून पहिल्या पाच गुंतवणुकांचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण १९ टक्के आणि पहिल्या गुंतवणुकांचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण ३५ टक्के राखलेले आहे.

जानेवारीनंतर बाजारात झालेल्या पडझडीचा सर्वाधिक फटका मिड कॅप समभागांना बसला आहे. अशा परिस्थितीत एकूण गुंतवणुकीच्या १० टक्के गुंतवणूक रोकड समरूप असलेले जे मोजके फंड आहेत त्यापैकी हा एक फंड आहे.

येत्या एप्रिलपासून फंडाच्या प्रमाणीकरणानंतर सर्वच फंड एकसमान दिसतील आणि फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा बदलल्यामुळे मागील परताव्याच्या कामगिरीनुसार फंडाची निवड करणे व्यर्थ असेल. अशा परिस्थितीत एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिड कॅप फंडांमध्ये झाला आहे.  सचिन रेळेकर यांच्यासारख्या फंड मॅनेजरच्या व्यवस्थापनाखाली हा फंड भविष्यात अव्वल कामगिरीच्या बळावर गुंतवणूकदारासाठी संपत्ती निर्मिती करेल याबद्दल आशा आहे.

आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या शिफारसीनुसार या फंडाचा गुंतवणुकीत समावेशाचा निर्णय करावा. ही या पाडव्याची “धननलाभ”ची शिफारस !!

अभिप्राय द्या!