अमेरिकेतल्या आयातीवर मोठे कर लादून त्या आयातीचा प्रवाह आवळण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावलं टाकत आहे. त्यासाठी इतिहासात विशेष कधी वापरल्या न गेलेल्या तरतुदींवरची धूळ झटकली जात आहे.

एखाद्या वस्तूच्या अमेरिकी निर्यातीवर कुठला देश १० टक्के कर लावत असेल तर अमेरिकाही त्या देशातून होणाऱ्या त्या वस्तूच्या आयातीवर किमान १० टक्के कर लादेल. विकसित देशांमधले आयात कर हे सहसा विकसनशील देशांच्या आयात करांच्या पातळीपेक्षा बरेच खालच्या स्तरावर असतात. जागतिक व्यापार संघटनेनेही हे तत्त्व मान्य केलेलं आहे. त्याला तिलांजली देऊन अमेरिकेने ‘जशास तसे’ असं नवं तत्त्व अंगीकारलं तर त्याचा परिणाम विकसनशील देशांच्या अमेरिकी निर्यातीवरचा करभार वाढण्यात होईल.

आठवडाभरात ट्रम्प यांनी आणखी दोन आघाडय़ा उघडल्या. एक तर चीन बौद्धिक संपदेच्या नियमांचं पालन करत नाही, अशा सबबीखाली आणखी एका तरतुदीचा वापर करून अमेरिका चीनमधून येणाऱ्या बऱ्याच वस्तूंच्या आयातीवरचा कर वाढवेल, अशा बातम्या आल्या आहेत. दुसरीकडे, भारत सरकारच्या निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना या जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत, अशी तक्रार अमेरिकेने व्यापारी संघटनेकडे केली आहे.

ट्रम्प यांच्या या सगळ्या आक्रमक पावलांमुळे जागतिक व्यापाराचं विश्व सध्या ढवळून निघालं आहे. चीन आणि युरोपीय समूहाने पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरच्या आयात करांना कडाडून विरोध करताना अमेरिकी निर्यातीवर नवे कर लादण्याचा इशारा दिला आहे. या नव्या करांविषयीची घोषणा करताना अमेरिकेने असंही जाहीर केलंय की अमेरिकेचे मित्र-देश वाटाघाटी करून आणि त्यांच्या निर्यातीमुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येणार नाही, अशी हमी देऊ न या करापासून आपल्यापुरती सूट मागू शकतील. या नव्या करांमधून सध्या अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको यांना वगळलंय. पण त्याचबरोबर त्या दोन्ही देशांबरोबर अमेरिका ‘नाफ्ता’ या मुक्त व्यापारी कराराच्या फेरआखणीची बोलणी करतंय. त्या वाटाघाटींमध्ये या करांच्या टांगत्या तलवारीचा दबाव म्हणून वापर केला जाणार आहे. एकंदर, जागतिक व्यापार संघटनेची नियमबद्ध चौकट न जुमानता कुणाला धमकावून, कुणाला चुचकारून, द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये व्यापाराबरोबरच अमेरिकेच्या हिताचे इतर मुद्दे घुसडून आयातकर निश्चित करण्याची एक नवी पद्धत ट्रम्प प्रशासन आणू पाहतंय. अशा अपारदर्शक पद्धतीमध्ये काही व्यक्तींचे किंवा गटांचे हितसंबंधही लुडबुडू शकतील.

यापायीच बाजारात पडझड सुरु आहे !!

अभिप्राय द्या!