नवख्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड गुंतवणुकीस कुठून सुरुवात करावी?
तुमच्या बचतीचा विनियोग करण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांचा विचार करीत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. म्युच्युअल फंडाचा पट खूपच विस्तृत असून एका दिवसापासून ते सेवानिवृत्तीनंतरच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी २०-२५ वर्षे गुंतवणूक करता येईल अशी साधने उपलब्ध आहेत. प्रत्येक गुंतवणूक साधनांची जोखीम वेगवेगळी असून गुंतवणूकदाराने सर्वप्रथम आपली जोखीम सोसण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी निश्चित करून त्या नुसार गुंतवणूक साधनाची निवड करायची आहे. त्यासाठी तुमची जोखीम चाचणी केली जाणे आवश्यक असते.
गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी काही औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे असते. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार आणि सह-गुंतवणूकदाराला ‘केवायसी’ अटींची पूर्तता करावी लागते. गुंतवणूकदार आणि सह-गुंतवणूकदारचे पॅन आणि आधारकार्ड यांच्या स्वप्रमाणित छायाप्रती केवायसी अर्जासोबत लावणे गरजेचे असते. पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्याने आपल्या म्युच्युअल फंड अर्जासोबत पूर्ण भरलेला केवायसी अर्ज म्युच्युअल फंड विककेता, म्युच्युअल फंडाचे कार्यालय किंवा फंडाचे रजिस्ट्रार यांच्याकडे जमा करावा.
नव्याने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला लिक्विड फंडाने सुरुवात करणे कधीही चांगले. लिक्विड फंड हे आधुनिक युगाचे बचत खाते आहे. ही गुंतवणूक इतकी तरल असते की, ती केव्हाही मोडून बँकेच्या बचत खात्यात पैसे असल्यासारख्या गरजप्रसंगी त्वरेने रक्कम मिळविता येते. ‘सेबी’ने प्रत्येक फंड घराण्यांना त्यांच्या लिक्विड स्कीम्सपैकी एका योजनेत इन्स्टंट रिडम्प्शन सुविधा असणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे लिक्विड फंडातून कमाल ५० हजार रुपये किंवा उपलब्ध रकमेच्या ९५ टक्के पैसे गुंतवणूकदारांना आपल्या बचत खात्यात त्वरित हस्तांतरित करता येतात.
समभाग गुंतवणूक करणाऱ्या स्कीमची निवड करताना इंडेक्स फंड किंवा एक्स्चेंज ट्रेडेड फंड निवडणे चांगले. पहिल्यांदा गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार गुंतवणुकीचा आणि बाजार वर-खाली होताना आपल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी-अधिक होण्याचा अनुभव घेत असतो. इंडेक्स फंड आणि निर्देशांक यांच्यातील जवळचा संबंध असतो. त्या नंतर लार्ज कॅप, मिड कॅप आणि अंतिमत: स्मॉल कॅप फंडातून गुंतवणूक करणे कधीही चांगले