साधारणपणे गुंतवणूक म्हटल्यावर एकतर बँकांमधील मुदतबंद ठेव किंवा थेट शेअर बाजारातील गंतवणूक असे दोन टोकाचे विचार पाहायला मिळतात. मुदतबंद ठेवी सुरक्षित समजल्या जातात. तसेच त्यापासून ठराविक दराने व्याजही मिळते. म्हणजे मूळ गुंतवणूक तशीच राहते व परतावासुध्दा मिळतो. याउलट शेअर्समधील गुंतवणूक जर फारसा विचार न करता केली तर ती धोकदायक ठरू शकते. शेअर्समध्ये होणारे चढउतार इतके मोठे असतात की मूळ गुंतवणूकसुध्दा काही वेळेला परत मिळत नाही तर काहीवेळा काही वर्षांतच दामदुप्पटसुध्दा होऊ शकते. या दोन्ही गुंतवणुकांमध्ये असलेले तोटे कमी करून दोन्हीचे फायदे थोड्याफार प्रमाणात एकत्र करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे.

बँकांमधील ठेवींवर मिळणारे मर्यादित व्याज, महागाई, शेअरबाजारातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारांसाठी मध्यममार्ग होऊ शकतो.

म्युच्युअल फंड हा एक विश्वस्त असून त्यामार्फत समान आर्थिक उद्दिष्टे असलेल्या गुंतवणूकदारांकडून लहान मोठ्या प्रमाणावर होणारी बचत एकत्रित केली जाते व असा एकत्रित झालेला निधी शेअर्स, डिबेंचर्स यासारख्या भांडवल बाजारातील साधनांमध्ये गुंतविला जातो.

या प्रक्रियेमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर जो काही लाभ (किंवा तोटा) होईल तो या लहानमोठ्या गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या प्रमाणात विभागून दिला जातो. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार, जे शेअर बाजारातील चढउतारापासून स्वतःला दूर ठेवू इच्छितात, परंतू ज्यांना अशा चढउताराचा फायदा घ्यायचा आहे अशा गुंतवणूकदारांसाठी एक स्वस्त पर्याय म्हणून म्युच्युअल फंड उदयास येत आहे.

फक्त सल्लागारांचा सल्ला घेऊनच यामध्ये प्रवेश करणे हितावह आहे !!

अभिप्राय द्या!