एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंड हा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ संकल्पनेनुसार मल्टी कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करताना विशिष्ट उद्योग क्षेत्राबद्दल विशेष आत्मीयता बाळगून गुंतवणूक करणारा किंवा काही कारणांनी एखादे उद्योग क्षेत्र न टाळणारा फंड आहे. निधी व्यवस्थापक आर्थिक आवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या उद्योग क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे मूल्यांकन विचारात घेऊन गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करतात.  या फंडाची मालमत्ता फेब्रुवारी २०१८ च्या ‘फंड फॅक्ट शीट’नुसार ३,२६३ कोटी आहे. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’चा अवलंब करणाऱ्या फंड गटात पाच वर्षांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीवर आणि तीन वर्षे कालावधीत नियोजनबद्ध गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा एबीएसएल प्युअर व्हॅल्यू फंडाने दिला आहे. फंडाच्या पहिल्या दिवसापासून ५,००० रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २१ मार्च २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य २०.०७ लाख रुपये असून वार्षिक परताव्याचा दर २२.९८ टक्के आहे.

या फंडाच्या गुंतवणुकीत भविष्यात भांडवली लाभ देणारे परंतु सद्य:स्थितीत अंतर्निहित किमतीपेक्षा कमी किमतीला उपलब्ध असलेल्या समभागांचा समावेश केला जातो. फंडाचे निधी व्यवस्थापक या प्रकारचे समभाग हुडकून योग्य किमतीत समावेश करण्यात यशस्वी झाल्याचे फंडाच्या कामगिरीवरून दिसत आहे. गुंतवणुकीसाठी फंडाने रसायने, तेल आणि वायू, धातू, पायाभूत सुविधा आणि गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांना प्राथमिकता दिली असून, फंडाच्या गुंतवणुकीत एचपीसीएल, टाटा केमिकल्स, गुजराथ अल्कली, इंडिया सिमेंट, एनसीसी आणि स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत. मागील वर्षभरात फंडाच्या गुंतवणुकीत समभागांची संख्या ५८ ते ६२ राखली असून मिड कॅप फंड असल्याने समभागकेंद्रित जोखीम न पत्करण्याचे निधी व्यवस्थापकांचे धोरण जोखीम नियंत्रित करण्याच्या दृष्टीने योग्य आहे. एमआरएफ, बाटा इंडिया, एल अँड टी फायनान्स यांसारख्या दर्जेदार समभागांचा निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत योग्य वेळी समावेश केला आहे. फंडाच्या पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते. मागील महिन्यांत फंडाने आठ समभाग वगळून ११ समभागांचा नव्याने समावेश केला. सक्रिय व्यवस्थापन आणि ५० टक्क्यांच्या आसपास राखलेले मिड कॅपचे प्रमाण फंडाच्या यशाचे गमक होय. महेश पाटील आणि मिलिंद बाफना हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. बीएसई २०० हा निर्देशांक फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाचे प्रमाणित विचलन अन्य मिड कॅप फंडापेक्षा अधिक असले तरी फंडाचा परतावा आणि जोखमीचे गुणोत्तर अन्य मिड कॅप फंडापेक्षा उत्कृष्ट आहे.

यामध्ये SIP करावी हा धनालाभ् तर्फे सल्ला !!

 

अभिप्राय द्या!