एखाद्या सर्वसामान्य मिळवत्या मुलाला सध्या रू. ६००० /- एवढीच मासिक प्राप्ती आहे पण योग्य फंड निवडून त्यात SIPकरून हा मुलगा सुद्धा करोडपती होऊ शकतो . फक्त सातत्य व पेशंस हवा !! कसा ते पहा !!
बॅंक, पोस्ट किंवा कंपनी ठेवींवरील (एफडी) एक आकडी व्याजदर, सोन्याच्या भावातील स्थिरता, रिअल इस्टेटमधील मंदीमुळे तेथील गुंतवणुकीचे लुप्त झालेले आकर्षण अशा परिस्थितीत चलनवाढ किंवा महागाईच्या दरावर मात करणारा परतावा कोठे मिळू शकेल, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
चलनवाढीचा दर ६-७ टक्के गृहीत धरला आणि त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला, तरच तो ‘खऱ्या अर्थाने परतावा’ असतो; पण वर्षानुवर्षे लोकप्रिय असलेल्या निव्वळ ‘एफडीं’वर विसंबून असा ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळू शकतो का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज देशातील लोकांची बचत प्रामुख्याने अशा ‘एफडीं’मध्येच अडकून राहिलेली आहे.
आजही अनेक जण आपली गुंतवणूक अशा ‘एफडीं’मध्ये अडकवून ६ ते ८ टक्के परतावा मिळवत आहेत आणि चांगला परतावा मिळत असल्याचे मानसिक समाधान मिळवत आहेत. हे करताना महागाईच्या दराचा आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाचा फारसा विचार होताना दिसत नाही. आपल्या दैनंदिन वापराच्या असंख्य वस्तूंमधून महागाईचा दर आपल्या खिशाला रोज कात्री लावत असतो आणि त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष न देता आपण ६ ते ८ टक्के परताव्यातच धन्यता मानत बसतो. तेव्हा आपल्या गुंतवणुकीबाबत अधिक जागरूक होऊन विचार करण्याची वेळ आता आली आहे, त्याची वेळीच दखल घेऊन गुंतवणुकीच्या सवयी बदलल्या नाहीत, तर भविष्यकाळ आणखी कठीण ठरू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
कोठून मिळेल चांगला परतावा?
महागाई किंवा चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असलेली गुंतवणूक म्हणून आज ‘इक्विटी’ या ॲसेट क्लासकडे बघितले जात आहे. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे ज्यांना जोखमीचे वाटते, अशा लोकांना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो; पण म्युच्युअल फंडातही एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने जात दरमहा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. अशी दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात मोठी रक्कम जमू शकते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, करबचतीसाठी, मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची तरतूद करण्यासाठी, कार-घर खरेदी करण्यासाठी, परदेशी पर्यटनाला जाण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीनंतरची तरतूद म्हणूनही याकडे पाहता येते. आधी सांगितल्याप्रमाणे बॅंक किंवा पोस्टातील मुदत ठेवी, एनएससी, पीपीएफ आदींपेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता यात असते. अर्थात, शेअर बाजाराशी निगडित जोखमीच्या अधीन ही गुंतवणूक असते. त्यामुळे निश्चित परताव्याची हमी यात नसते, हे लक्षात घेतले पाहिजे; परंतु दीर्घकाळ गुंतवणूक करून संयम ठेवल्यास चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.
सातत्य आणि संयम या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या, तर ‘एसआयपी’द्वारे तुम्ही तुमची स्वप्ने साकार करू शकता. ज्यांनी अजूनही ‘एसआयपी’ची वाट चोखाळली नसेल, त्यांना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याचा मुहूर्त साधायला काय हरकत आहे?
‘एसआयपी’ करताना…
तरुण वयात थोडी जोखीम पत्करून, मुदत ठेवींऐवजी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये जास्त रकमेचे ‘एसआयपी’ केले, तर आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळू शकते.
केवळ ‘एसआयपीं’ची संख्या जास्त ठेवल्याने जोखीम कमी होते, असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकाच प्रकारच्या अनेक योजनांमध्ये ‘एसआयपी’ करण्यापेक्षा लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, सेक्टोरल, बॅलन्स्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये विभागून करावी.
दर महिन्याच्या ‘एसआयपी’च्या रकमेत जर दरवर्षी १० टक्क्याने वाढ केली, तर दीर्घकाळात त्याचा चांगला फायदा होतो. त्यासाठी ‘स्टेपअप’ किंवा ‘टॉपअप’ पर्याय निवडावा.
‘एसआयपी’ची मुदत संपल्यानंतर त्यातील जमा रक्कम काढणे बंधनकारक नसते. आपल्या गरजेनुसार त्यात पुन्हा गुंतवणूक सुरू ठेवण्याचा किंवा पैसे काढून घेण्याचा निर्णय घ्यावा. ‘एसआयपी’ बंद न करताही जमलेल्या रकमेमधून पाहिजे तेवढी रक्कम काढता येते; तसेच काही आर्थिक अडचण आल्यास ‘एसआयपी’ मधेच थांबविता येते.
जोखीम कमी करण्यासाठी शक्यतो दोन-तीन योजनांमध्ये ‘एसआयपी’ सुरू करून त्यांच्या तारखा वेगवेगळ्या ठेवाव्यात. कोणत्याही कारणाने न भरले गेलेले ‘एसआयपी’चे हप्ते नंतर कधीही भरून काढता येतात. मागील हप्ते नंतर भरलेच पाहिजेत, अशी सक्ती नसते आणि त्यासाठी दंडही होत नसतो.
गुंतवणूकदारांनी आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी किती निधी पाहिजे आणि तो किती वर्षांत निर्माण करायचा आहे, हे ठरवावे. यासाठी दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल, याचे गणित मांडता येईल.
जर गुंतवणूक कालावधी जास्त असेल किंवा जास्त दराने परतावा मिळणार असेल, तर साहजिकच दरमहा गुंतवायची रक्कम कमी होईल.
एकदा कालावधी निश्चित केला, की दररोज किंवा दरमहा आपल्या गुंतवणुकीकडे पाहण्याची गरज नसते. वर्षातून एकदा आढावा घेतला तरी पुरेसे ठरते.
आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी जो कालावधी असेल, त्या कालावधीसाठी ‘एसआयपी’ करावी. जर कालावधी १०-१५ वर्षांसाठी असेल, तर शक्यतो त्या संपूर्ण कालावधीसाठी किंवा किमान पाच वर्षांसाठी ‘एसआयपी’ चालू ठेवावी.
गुंतवणुकीत खंड पडल्यामुळे आर्थिक उद्दिष्टे साकार होण्यात अडथळे येऊ शकतात, हे लक्षात घ्यावे.
वयाच्या २२ व्या वर्षी रू १०००/-ची दरमहा sip करून कोणीही निवृत्ती वेळी किमान १ कोटीहून मोठी रक्कम मिळवू शकतो . कसे हे जाणून घेण्यासाटी धनलाभ च्या कार्यालयाशी संपर्क साधा!!