म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार दोन पद्धतींनी गुंतवणूक करू शकतात – एक म्हणजे डायरेक्‍ट प्लॅन आणि दुसरे म्हणजे रेग्युलर प्लॅन.

१) डायरेक्‍ट प्लॅन – या प्रकारची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला स्वतःच अभ्यास करून प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा अन्य संकेतस्थळांचा आधार घेऊन, माहिती घेऊन गुंतवणूक करावी लागते. म्युच्युअल फंडाच्या डायरेक्‍ट प्लॅनमध्ये फंडाचा ‘एक्‍स्पेन्स रेशो’ कमी असतो. त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्यही (एनएव्ही) वेगळे असते. पण अशी गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला कोणाचाही सल्ला मिळत नाही. स्वतःच अभ्यास करून योजना निवडावी लागते. पुढे, ठराविक कालावधीने त्याचा आढावा घेणे, योजनेतून बाहेर कधी पडायचे, दुसऱ्या योजनेत ‘स्वीच’ कधी करायचे, आदी सर्व गोष्टी संबंधित गुंतवणूकदारालाच ठरवाव्या लागतात.

२) रेग्युलर प्लॅन – या प्रकारची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला एखाद्या सल्लागारामार्फत गुंतवणूक करावी लागते. म्युच्युअल फंडाच्या रेग्युलर प्लॅनमध्ये फंडाचा ‘एक्‍स्पेन्स रेशो’ हा डायरेक्‍ट प्लॅनपेक्षा थोडा जास्त असतो. पण या ठिकाणी सल्लागाराकडून गुंतवणूकदाराला सेवा मिळू शकते.

अलीकडे असे ऐकायला मिळते, की गुंतवणूकदार ‘एक्‍स्पेन्स रेशो’मधील आणि ‘एनएव्ही’मधील थोडा फरक वाचविण्यासाठी ‘डायरेक्‍ट प्लॅन’मधील गुंतवणुकीला पसंती देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी करावी, असे माझे मत आहे आणि तसा प्लॅन करताना सल्लागाराने दिलेला सल्ला, त्याने करून दिलेली गुंतवणुकीची मांडणी याचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो. तुमच्या गुंतवणुकीच्या नियोजनात एक सल्लागार हा तुमचा ‘फायनान्शिअल डॉक्‍टर’ म्हणून काम करत असतो. त्‍यामुळे गुंतवणुकीच्या निर्णयासाठी एखाद्या चांगल्या ‘फायनान्शिअल डॉक्‍टर’चा सल्ला घेऊनच कृती करणे उचित ठरते. तो तुमच्या गरजेनुसार, उद्दिष्टानुसार योग्य ती गुंतवणूक योजना सांगतो; तसेच त्याचे तुमच्या गुंतवणुकीवर लक्षदेखील असते. शिवाय वेळोवेळी त्या गुंतवणुकीबाबत तो तुम्हाला मार्गदर्शनही करीत राहतो.

गेल्या काही आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार होताना दिसत आहेत. ज्यांनी ‘डायरेक्‍ट प्लॅन’मध्ये गुंतवणूक केली होती, त्यातील बऱ्याच गुंतवणूकदारांनी बाजारातील घसरणीला घाबरून गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना शेअर बाजाराचे आणि या बाजारातील चढ-उतारांचे सखोल ज्ञान नव्हते. फक्त मागील काही वर्षांचा परतावा बघून म्युच्युअल फंडाची योजना निवडणे आणि ‘एक्‍स्पेन्स रेशो’ कमी आहे म्हणून ‘डायरेक्‍ट प्लॅन’मधून गुंतवणूक करणे, अशा कृतीतून गुंतवणूकदारांचे ‘वेल्थ क्रिएशन’चे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होऊ शकत नाही. व यासाठीच तज्ञ सल्लागाराची गरज आहे हे निश्चित !!

अभिप्राय द्या!