सेबीने अलीकडेच म्युच्युअल फंडांच्या पुर्रचनेच्या संदर्भात पाउले उचलली आहेत. त्यामुऴे अनेक नवीन उपप्रकार किंवा स्किम्स म्युच्युअल फंडात उपलब्ध होणार आहेत.

रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन
त्यातलाच एक प्रकार असणार आहे, तुमच्या आर्थिक अडचणीं किंवा भविष्यातील विशिष्ट गरजांवर मार्ग काढणारे म्युच्युअल फंड. उदाहरणार्थ, रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन यासारख्या भविष्यातल्या तुमच्या गरजांची काळजी घेणारे फंड. यासाठी मात्र पाच वर्षांचा लॉक इन कालावधी असणार आहे. म्हणजेच पाच वर्षांसाठी तुमच्या गुंतवणूकीतून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. लॉक इन कालावधीच्या नव्या पर्यायामुळे रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन याप्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करावी की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. या पर्यायांचा विचार करावा की ओपन एंडेड (ज्यातून आपण केव्हाही आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतो) फंडांमध्ये गुंतवणूक करत भविष्यातील आपल्या गरजांची तरतूद करावी यावरही चर्चा होते आहे.

पाच वर्षांचा लॉक इन कालावधी
सेबीच्या मते या प्रकारचे प्लॅन किंवा फंड हे विशिष्ट गरजा किंवा उद्दिष्ट लक्षात ठेऊन तयार केलेले असतात. याआधी या प्रकारचे फंड हे सर्वसाधारण इक्विटी किंवा बॅलन्स फंड प्रकारातच मोडत असत. नवीन निकषांप्रमाणे रिटायरमेंट स्किम्स किंवा चिल्ड्रन्स प्लॅन यांना पाच वर्षांचा लॉक इन कालावधी बंधनकारक करण्यात आला आहे. पाच वर्षांपर्यत गुंतवणूकदार यातील पैसे काढू शकणार नाहीत. अर्थातच पाच वर्षांनंतरसुद्धा जोपर्यंत रिटायरमेंट किंवा मुले मोठी होत नाहीत तोपर्यंत गुंतवणूक तशीच ठेवणे अपेक्षित आहे.

अभिप्राय द्या!