नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातील अक्षय तृतीयेसारख्या शुभमुहूर्तावर ‘एसआयपी’चा श्रीगणेशा करा!!
एसआयपी’ हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पूर्णपणे पोचलेला नाही. याची कारणे अनेक आहेत. जागा, फ्लॅट, सोने, एफडी आदी पर्यायात गुंतवणूक करताना खूप दूरचा विचार करणारे लोक ‘एसआयपी’च्या बाबतीत मात्र अतिशय कमी कालावधीचा विचार करतात. थोडक्यात, ‘एसआयपी’कडे बघण्याचा दृष्टिकोन अनेक वेळा चुकीचा असतो. त्यामुळे या चांगल्या पर्यायाचा उपयोग नीट प्रकारे होत नाही. अर्थात, योग्य म्युच्युअल फंड योजनेची निवड करणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हितावह असते.
शेअर बाजारात ‘भीती आणि लोभ’ हे सर्वांत मोठे शत्रू आहेत. त्या शत्रूंवर ‘एसआयपी’ गुंतवणूकदार मात करू शकतो. ‘एसआयपी’च्या मार्गाने गुंतवणूक केल्यास बाजाराची स्थिती अजिबात न पाहता गुंतवणूकदार शांतपणे आणि शिस्तबद्धपणे बाजारात प्रवेश करत राहतो. त्यामुळे आपोआप तो भीती आणि लोभ या शत्रूंवर मात करू शकतो. मात्र वर म्हटल्याप्रमाणे, गुंतवणूकदार ‘एसआयपी’द्वारे करायच्या गुंतवणुकीचा विचार अगदी अल्प काळासाठी म्हणजे सहा महिने किंवा एक वर्षासाठी करतात. याउलट ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी (किमान पाच वर्षे) ‘एसआयपी’ केली आहे, त्यांना उत्तम परतावा मिळालेला आहे, असे इतिहास सांगतो. त्यामुळे बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांकडे दुर्लक्ष करत जेवढा जास्त काळ ‘एसआयपी’ केली जाते, तेवढा जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते. बाजारातील चढ-उतारांपेक्षा गुंतवणूकदारांची लगेच ‘रिॲक्ट’ होण्याची मानसिकता अधिक धोकादायक असते. ‘एसआयपी’चा पर्याय निवडून अशा मानसिकतेवर मात करता येते. म्हणूनच येणाऱ्या काळात शेअर बाजारात घसरण झाली, तरी ‘एसआयपी’च्या गुंतवणूकदारांनी काळजी करण्याचे कारण नाही !!