आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी मिळविण्यासाठी —–

१ )साहजिकच आर्थिक स्वातंत्र्य ४०-४५ व्या वर्षी मिळवण्यासाठी त्या दृष्टीने करावे लागणारे नियोजन लवकरात लवकर सुरू केले पाहिजे. यासाठी योग्य आर्थिक नियोजकाची निवड करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणुकीचे असेच पर्याय निवडले गेले पाहिजेत जे तुमच्या ध्येयांशी संलग्न असतील. त्यात विम्याचा विचार गुंतवणूक म्हणून न पाहता ‘रिस्क कव्हर’ म्हणून करणेही समाविष्ट आहे.

२) आर्थिक नियोजकाकडे जाण्यापूर्वी तुमची संपूर्ण मानसिक तयारी असायला हवी. तुम्हाला खरेच मनापासून लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असल्यास, परंतु तुमची मनाची तयारी नसल्यास आर्थिक नियोजकाला तुम्हाला मदत करणे कठीण जाते. या ठिकाणी अलिक आईस यांनी म्हटले आहे- The secret to Financial Security is not to have more money, but having more control over money we have. कारण या नियोजनामध्ये बऱ्याच गोष्टी या तुमच्या सहकार्याशिवाय करणे शक्य नाही.

३ )तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांची मने यासाठी तयार असावी लागतात. समजा, यजमानांचा कल बचत करण्याकडे आहे, तर पत्नी तेवढा खर्च कमी करू शकत नसते किंवा काही कुटुंबांमध्ये हे उलटपक्षीही असते. पत्नीचा कल बचतीकडे असतो,   यजमान तेव्हा खर्च कमी करू शकत नाहीत. जोडीदारांना परस्परांच्या साहाय्याची यात अतिशय आवश्यकता आहे.

४) वरील मुद्दा यासाठी जरुरीचा आहे, कारण आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याच्या नियोजनात जेवढी जास्त बचत अर्थार्जनाच्या काळात करू तेवढे लवकर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगता येते.

५ ) केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळत आहे, त्यापेक्षा जास्तीत जास्त बचत कशी होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. कारण बचत करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

६) अवाजवी किंवा वायफळ खर्च कमी करण्यावर भर दिला गेला पाहिजे. उदा. एक स्मार्टफोन १२,००० रुपयाला येतो, तर दुसऱ्या ब्रॅण्डचा ६५,००० रु. / १,००,००० रुपयांना मिळतो. दोन्ही स्मार्टफोनचा वापर तेवढाच, त्यांचे आयुष्यही तेवढेच. निवड तुमच्या हातात असते.

७) कर्ज किंवा देणी असतील तर ती फेडण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे व पुढे जाऊन कर्जाची आवश्यता भासणार नाही अशा प्रकारे भविष्यातील ध्येयांचे नियोजन केले पाहिजे. यात क्रेडिट कार्डावर खर्च करणे टाळणे हेही समाविष्ट आहे.

८ )६०-६५ व्या वर्षांच्या मानाने लवकर निवृत्त झाल्यावर आपण काय करू इच्छिता याचा विचार पहिल्यापासूनच करा. एखादा आवडता व्यवसाय अथवा एखादे आवडीचे काम करू इच्छित असाल तर त्या संदर्भात माहितीही आतापासूनच गोळा करू शकता. असे काम करण्याचा प्रथम उद्देश तुमची आवड जोपासणे असेल, न की उत्पन्न मिळवणे. त्यामुळे त्या कामात तुम्ही आनंदी असाल.

जर तुम्ही खरोखरीच असे करू शकलात तर लवकरच तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकालच, शिवाय जीवनातील समाधान आणि आनंदही उपभोगू शकाल. आपल्या कुटुंबासाठी भरपूर वेळ देऊ  शकाल, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल, कौटुंबिक संबंध चांगले होतीलच, आयुष्यदेखील संतुष्ट असेल.

जग खूप मोठे आहे. चाकोरीबाहेर दृष्टी नेऊन पाहिल्यास अनेक गोष्टी उपभोगण्याचे अनुभव खूप सुंदर आहेत. मग तेच ते किंवा नाइलाजाने काम करीत राहणे, आवडीनिवडी बाजूला ठेवून केवळ प्रपंच म्हणून जीवन व्यतीत करणे कशासाठी? नक्की विचार करा. आढावा घ्या स्वत:च्या जीवनाचा, तुमची काय आवड आहे..? जीवनाच्या अनिश्चित कालावधीत तुम्ही काय करू इच्छित आहात..? जेवढा लवकर विचार कराल, तेवढे लवकर ते मिळविण्यासाठी मन बनेल, त्यामुळे पुढे जाऊन त्या दृष्टीने योग्य वाटचाल सुरू करू शकाल.

 आर्थिक वर्ष बदलले आहे म्हणून नव्या आर्थिक वर्षांत नवीन आर्थिक विचार आणि उद्दिष्टे ठेवा, नवीन सुरुवात करा.

अभिप्राय द्या!