आजच्या वाढत्या आकांक्षा आणि अपेक्षांच्या काळात आर्थिक नियोजनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गृहखरेदी, शिक्षण, आरोग्य यावरील वाढते खर्च पाहता, अल्प आणि दीर्घ मुदतीच्या खर्चासाठी व्यवस्थित तरतूद न केल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. हे सर्व लक्षात घेता आर्थिक सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे ही आता गरज बनली आहे; परंतु हे करण्यापूर्वी आपण स्वतःच आपले उत्पन्न, बचत आणि खर्च यांची सांगड घालून आर्थिक नियोजन नीट करीत आहोत ना, याची खात्री एका सोप्या चाचणीमधून करता येईल. ही पूर्वतयारी केल्यास आपण आजच्या घडीला कोठे आहोत आणि आपली उद्दिष्टे सध्या होतील की नाही, याचा अंदाज येऊ शकेल आणि आर्थिक सल्लागारांच्या मदतीने आणखी चांगल्यारीतीने नियोजन करता येईल.

पुढे दिलेल्या प्रश्नांना विविध पर्याय दिले आहेत. आपली सध्याची बचत आणि खर्चाची स्थिती लक्षात घेऊन पर्याय निवडावेत आणि एकंदर मिळालेले गुण एकत्र करावेत. यातील महत्त्वाचे म्हणजे पर्याय क्रमांक हेच गुण आहेत. यातून आपण आपला आर्थिक संकल्प कसा आहे आणि सद्यःस्थितीमध्ये काय बदल करावा लागेल, हे लक्षात येईल.

अ) आपण वैद्यकीय उपचार, अपघात यासाठी तरतूद किंवा विमा घेतला आहे काय?- 1) नाही, 2) विचार आहे, 3) अपुरी तरतूद आहे, 4) होय.
ब) आपल्या मासिक उत्पन्नाच्या किती टक्के बचत करता?- 1) दरमहा बचत होत नाही, 2) 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, 3) 15 ते 20 टक्के, 4) 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त.
क) आपल्या मासिक उत्पन्नाच्या किती टक्के करमणूक आणि हॉटेलवर खर्च करता?- 1) 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, 2) 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, 3) 15 ते 20 टक्के, 4) 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी.
ड) आपण वर्षातून किती वेळा क्रेडिट कार्डची रक्कम मुदतीनंतर भरता?- 1) 5 पेक्षाजास्त, 2) 3 ते 4 वेळा, 3) 2 वेळेस, 4) कधीच नाही.
ई) आपण दीर्घकालीन खर्चासाठी दरमहा पुरेशी बचत करता का?- 1) रक्कम महिनाअखेरीस शिल्लकच राहात नाही, 2) सातत्य नाही, 3) अपुरी बचत, 4) पुरेशी बचत करण्यात येते.
यातून येणारे गुण आणि निष्कर्ष हा एक ठोकताळा आहे हे लक्षात घ्यावे.

5 ते 9 गुण: खर्च खूप जास्त असून, आर्थिक शिस्तीची तातडीने आवश्‍यकता आहे.
10 ते 15 गुण: खर्च जास्त असला तरी त्यावर नियंत्रण ठेवल्यास परिस्थिती सुधारेल.
16 ते 20 गुण: आर्थिक नियोजन आणि संकल्प चांगला आहे. भविष्यातसुद्धा हे सातत्य राखणे गरजेचे आहे.
उत्तम आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे इष्ट ठरेल.

अभिप्राय द्या!