म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जर ठराविक कालावधीच्या अगोदर काढून घेतली तर ‘एक्‍झिट लोड’ लागू होतो. हा कालावधी प्रत्येक योजनेनुसार वेगवेगळा असतो व तो संबंधित योजनेच्या ‘स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्‍युमेंट’मध्ये (सिड) नमूद केलेला असतो. गुंतवणूकदाराने गुंतविलेली रक्कम ही काही काळासाठी तरी त्या योजनेत राहावी, ज्या योगे फंड व्यवस्थापकाला निर्धास्तपणे गुंतवणूक करता यावी, हा या ‘एक्‍झिट लोड’मागचा हेतू असतो. ‘एक्‍झिट लोड’ हा संबंधित योजनेच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’च्या (एनएव्ही) काही टक्के असतो. उदाहरणार्थ- तुम्ही एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी रु. १० हजार गुंतविले असतील तर त्या वेळेस तुम्हाला १०० युनिट्‌स प्रत्येकी १०० रुपये भावानुसार मिळाली. आता त्याच युनिट्‌सटी सध्याची एनएव्ही ११० रुपये आहे. ‘एक्‍झिट लोड’ समजा १ टक्का आहे, तर तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक काढून घ्यायची झाल्यास प्रत्येक युनिटमागे १.१ (११०x१ टक्का) म्हणजे एकूण रु. ११० (१.१x१००) ‘एक्‍झिट लोड’ लागेल व रु. १०,८९० हातात येतील. काही योजनांमध्ये ‘एक्‍झिट लोड’ हा जसा योजनेचा कालावधी वाढत जाईल, तसतसा कमी-कमी होत जातो. उदाहरणार्थ, एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास ३ टक्के, दोन वर्षांच्या आत पैसे काढल्यास २ टक्के, तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास १ टक्के आणि तीन वर्षांनंतर काहीही नाही.

बऱ्याच गुंतवणूकदारांचा असा समज असतो, की सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (एसआयपी) ‘एक्‍झिट लोड’ हा ठराविक कालावधीनंतर (समजा १ वर्ष) लागत नाही. पण तसे नसते. तुमचे जे हप्ते भरून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्या हप्त्यावरती ‘एक्‍झिट लोड’ लागणार नाही; बाकी सर्वांवर लागेल. उदाहरणार्थ, एक जानेवारीला २०१७ रोजी तुम्ही रु. १० हजारांचे मासिक एसआयपी चालू केले आणि दर महिन्याच्या एक तारखेला तुम्ही तुमचे हप्ते नियमितपणे भरत आहात. समजा, २५ एप्रिल २०१८ रोजी तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक काही कारणांनी काढून घ्यायची आहे. अशा वेळेस तुम्हाला जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत मिळालेल्या युनिट्‌सवर ‘एक्‍झिट लोड’ लागणार नाही. कारण हे हप्ते भरुन एक वर्ष पूर्ण झालेले आहे. मे २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत तुम्हाला जेवढी युनिट्‌स मिळाली असतील, त्या युनिट्‌सवर तुम्हाला ‘एक्‍झिट लोड’ लागेल.

ज्या गुंतवणूकदारांना पैसे अगदी कमी कालावधीसाठी गुंतवायचे असतील, त्यांनी अशा योजनांमध्ये गुंतवावेत, की जिथे ‘एक्‍झिट लोड’ नाही. कित्येकदा एकरकमी गुंतवणूक करताना पैसे डेट फंडात गुंतविले जातात व तेथून ‘सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’द्वारे (एसटीपी) एका ठराविक वारंवारतेने हे पैसे इक्विटी फंडात हस्तांतरित केले जातात. अशा वेळेला गुंतवणूकदारांनी असाच डेट फंड निवडावा, की जेथे ‘एक्‍झिट लोड’ नाही म्हणजे इक्विटी फंडात पैसे हस्तांतरित करताना दर वेळेस ‘एक्‍झिट लोड’ द्यावा लागणार नाही.

अर्थात, गुंतवणूकदारांनी ‘एक्‍झिट लोड’कडे फुकटचा खिशाला भुर्दंड म्हणून बघण्यापेक्षा, यामुळे आपले पैसे जास्त कालावधीसाठी गुंतले जातात व त्याचा आपल्यालाच फायदा होतो, या दृष्टीकोनातून बघावे.

अभिप्राय द्या!