मागील तीन महिन्यांत शेअर बाजाराने चढ-उतार दोन्ही अनुभवले. यानिमित्ताने वाचकांना आम्ही जे प्रत्येक वेळी सांगत आलो, त्याचे महत्त्व लक्षात आले असेल. आम्ही आमच्या लेखात कायम सांगत आलो आहोत, की नफा काढून घेत राहावा; जेणेकरून मंदी आल्यास आपल्याला पुनर्गुंतवणुकीची संधी मिळते. नफा काढून घेतल्यामुळे, शेअरचा भाव खाली आल्यास घाबरून न जाता अथवा ‘पॅनिक’ न होता आपण आपल्याकडील शेअर पुढे सांभाळू शकतो. शेअर बाजारात जोखीम ही असतेच, हेही आम्ही कायम निदर्शनास आणत राहिलो. बाजारातील घसरण या गोष्टीची जाणीव करून देते. वक्रांगी सारखा शेअर, ज्याचे बाजारमूल्य केवळ ३-४ महिन्यांपूर्वी जवळपास ५० हजार कोटींपर्यंत गेले होते, त्याने केवळ तीन महिन्यांत जवळजवळ ७५-८० टक्के घट दर्शविली.

पुढील प्रवास कसा राहील?
शेअर बाजारात गुंतवणूक ही कायम दीर्घकालीनच असावी; परंतु प्रत्येक वेळी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेत राहावा व केवळ ती दीर्घकालीन आहे म्हणून ती विसरताही कामा नये. २०१८ या वर्षात २०१७ सारखा परतावा मिळेल, ही अपेक्षा करू नये. कारण कर्नाटकसह काही राज्यांतील विधानसभा निवडणूक, वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक व कच्च्या तेलाचे वाढलेले भाव या सर्व गोष्टींमुळे या वर्षी अस्थिरता राहणार आहे. त्यामुळे वेळोवेळी आपल्याला होणारा नफा बाजारातून काढत राहावा आणि फेब्रुवारी व मार्चप्रमाणे पडझड झाल्यास ‘पॅनिक’ न होता चांगले शेअर घेत राहावे. कारण मंदी हीच शेअर खरेदीची खरी संधी असते, फक्त ती दीर्घकालीन उद्देशानेच घ्यावी हाच आजचा सल्ला !!

अभिप्राय द्या!