राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) सदस्यांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी काही रक्कम ठरावीक कारणांसाठी काढता येणार आहे. उच्चशिक्षण तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ही रक्कम काढता येईल.

या योजनेचे नियमन करणाऱ्या पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (पीएफआरडीए)ही माहिती दिली आहे. पीएफआरडीएच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उच्चशिक्षण घेऊ इच्छिणारे तसेच नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करणाऱ्या पेन्शन योजनेतील सदस्यांना यापुढे जमा रकमेचा विशिष्ट हिस्सा काढता येईल, असे पीएफआरडीएने सांगितले. या योजनेतील सदस्य आपली रक्कम इक्विटीमध्ये गुंतविण्याचा अधिकार एनपीएसला देऊ शकतात. एनपीएसच्या निर्णयानुसार इक्विटीमधील ही गुंतवणूक मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचे सध्या दोन कोटी १३ लाख सदस्य आहेत.

अभिप्राय द्या!