ऐतिहासिक म्हणता येईल असा निर्णय सेबीनं घेतला असून शेअर बाजारातील इक्विटी डेरिव्हेटिव सेगमेंटमध्ये सकाळी 9 चे रात्री 11.55 मिनिटांपर्यंत व्यवहार करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. ज्या एक्सचेंजेसना शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या वेळा वाढवायच्या असतील त्यांना सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबीकडून परवानगी घ्यावी लागेल आणि नंतर वेळा वाढवता येतील.

वेळेतील हा बदल 1 ऑक्टोबर 2018 पासून अमलात आणता येणार आहे. असा बदल करू इच्छिणाऱ्या एक्सचेंजना जोखीम व्यवसथापन आणि व्यवहारांचे सेटलमेंट तसे करण्यात येईल याची माहितीही द्यावी लागणार आहे. सेबी अॅक्ट, 1992 च्या सेक्शन 11 (1) अंतर्गत सेबीनं हा निर्णय घेतला असून तो शुक्रवारी जाहीर केला आहे. तज्ज्ञांच्या मते या निर्णयाचा गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

जगभरामध्ये इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये उशीरापर्यंत व्यवहार करण्याची मुभा असते, आता भारतही त्या पंक्तीत बसणार असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे. ही सकारात्मक घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी असल्याचे मत एका तज्ज्ञानं व्यक्त केलं आहे. खूप वर्षांपासून एक्सचेंजेसची ही मागणी प्रलंबित होती, या निर्णयामुळे भारतीय भांडवली बाजाराची खोली वाढणार असून गुंतवणूकदारांसाठी चांगल्या संधी निर्माण होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu