पंतप्रधान वयवंदना योजनेच्या विस्तार झाला आहे . आतापर्यंत या योजनेची कमाल मर्यादा साडेसात लाख रुपये होती. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतविता येतील व त्यांना जास्तीत जास्त १० हजार रुपये मासिक पेन्शन (व्याज) मिळेल. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून कार्यान्वित आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना या विस्ताराबाबत सुतोवाच केले होते. मुदत ठेवींचे दर सतत घटते असल्याने आठ टक्क्यांचा निश्चित परतावा देणारी ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित व फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे.

वयाची अट

या योजनेत ६० व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येईल. या योजनेचा कालावधी १० वर्षांचा असून त्यावर आठ टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेत ३१ मार्च २०२०पर्यंत प्रवेश घेता येईल.

या योजनेत किमान दीड लाख व कमाल १५ लाख रुपये गुंतविता येतील. यातून मिळणारे व्याज हे निश्चित स्वरूपाचे असेल. अर्थव्यवस्थेतील चढउतार, बँकांच्या व्याजदरांतील बदल याचा काहीएक परिणाम या योजनेच्या व्याजावर होणार नाही.

व्याजासाठी विविध पर्याय

यात एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर खातेदाराला मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक पद्धतीने व्याज घेण्याचे पर्याय आहेत. यात जास्तीत जास्त १० हजार रुपये मासिक व्याज मिळू शकेल, त्यासाठी १५ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दीड लाखांच्या गुंतवणुकीवर मासिक एक हजार रुपये व्याज मिळेल. अन्य रकमांवरही त्या प्रमाणात व्याज मिळू शकेल. वार्षिक पेन्शनचा पर्याय घेतल्यास आठऐवजी ८.३ टक्क्यांनी व्याज मिळेल. त्यामुळे वार्षिक व्याजाचा पर्याय सर्वात फायदेशीर आहे. मात्र बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा कल हा मासिक व्याजाकडेच असल्याने वार्षिक व्याज घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu