शेअर बाजारातील सततच्या घडामोडींमुळे सामान्य नागरिकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. परिणामी तो गुंतवणुकीपासून दूर असल्याचे दिसून येते. मात्र, सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की बाजारमध्ये येणारे हे चढ-उतार ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. बाजार नेहमीच बदलत असतो. परंतु दीर्घकाळामध्ये बाजार सकारात्मक असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाजारातील परिस्थितीचा बाऊ न करता खाली घसरलेला बाजार म्हणजे नवीन गुंतवणूकदारांना कमी पैशांमध्ये जास्त खरेदी तर जुन्या गुंतवणूकदारास आणखी गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी दिलेली संधी म्हणून बघितले पाहिजे.

गुंतवणूक आज की उद्या
गुंतवणूकीच नियोजन करताना तुमचे उत्पन्न, खर्च किंवा इतर जबाबदारी इत्यादींचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे वेळेपेक्षा तुमची क्षमता हा भाग महत्वाचा. असं असलं तरी उद्या एकदम पैसे आले कि गुंतवणूक करता येतील असा विचार ना करता आहे त्या बचतीतून आजच गुंतवूक करण्यास प्राधान्य देणं हे केंव्हाही चांगलं. कारण तुमच्याकडे आलेल्या एकरकमी किंवा मोठ्या पैशातून तुम्ही गुंतवणूक वाढवू शकता पण जर पैसे आले नाही तर तुमचं नुकसानच होत असतं. गुंतवणूक ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असल्यानं योग्य नियोजन आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार गुंतवणुक करण्यास सुरुवात केली पाहिजे.

वयोमर्यादा
वयाच्या पंचविशीत किंवा पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारापासून केलेली गुंतवणूक ही नेहमीच उत्तम असते हे वादातीत आहे. अगदी ५०० रुपयांपासून सुरु केलेली एसआयपी देखील दीर्घकाळामध्ये खूप फायदेशीर आणि चांगली परतावा देणारी ठरते. तसेच तुम्ही टप्प्याटप्प्याने जसा तुमचा पगार किंवा उत्पन्न वाढेल त्याप्रमाणे तुमची गुंतवणूक वाढवू देखील शकता. परंतु, गुंतवणूक करण्यास ठराविक असच वय असलं पाहिजे असं नाही. उशिरा सुरु केलेली गुंतवणूक देखील मुलांच्या उच्च शिक्षण, लग्न किंवा रिटायरमेंट साठी कमी येईल. अगदी रिटायरमेंट मध्ये केलेली म्युच्यअल फंडातील गुंतवणूकसुद्धा तुम्हाला दर महिन्याला लागणाऱ्या खर्चाला कामी येऊ शकते.

गुंतवणुकीसाठी बाजारातील योग्य स्थिती
दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळतो. दीर्घकालीन कालावधीचा विचार केल्यास बाजारातील परिस्थितीचा विचार करण्याची गरज नाही. कारण कुठल्याही योजनेचे फंड व्यवस्थापक हे अनुभवी असतात. पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी संपूर्ण टीम कार्यरत असते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेण्यास समर्थ असतात. विशेषतः एसआयपी मध्ये तर बाजारातील स्थितीचा जास्त विचार करण्याची काहीच गरज नाही. कारण आपण दरमहा किंवा ठराविक टप्प्याने गुंतवणूक करत असल्याने घसरलेल्या बाजारात जास्त युनिट्स मिळून फायदाच होतो. मात्र, जर तुम्ही एकरकमी गुंतवणूक करणार असाल तर बाजारामध्ये मिळणाऱ्या ‘करेक्शन’ चा फायदा घेऊन गुंतवणूक केलेली योग्य.

जुनी की नवी योजना
बऱ्याच गुंतवणूकदरांचा कल हा नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे असतो. सामान्यतः ठराविक कालावधीमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवीन योजना आणल्या जातात. परंतु त्या किती यशस्वी होतील याची कुठलीही शाश्वती नसते. तुलनेत जुन्या योजनांच्या कामगिरीचा अहवाल उपलब्ध असल्याने त्या योजनेची एकंदरीत परतावा, त्याची बाजारातील किंमत इत्यादी गोष्टींचं आकलन होण्यास मदत होते. बाजारातील चढ उताराच्या चक्रातून या योजना गेल्या असल्यानं त्यांची जोखीम क्षमता न परतावा याचा प्रत्यक्ष परिणाम पाहून अशा योजना गुंतवणूक करण्यास आश्वासक वाटतात.

पण अनुभावी सल्लागाराचा सल्ला घेवूनच हि पावले उचलावीत असा धनलाभचा सल्ला !!

अभिप्राय द्या!